मंदिराकडे भाविकांचा वाढता ओढा !
नाशिकमधील सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिर सर्वांनाच ज्ञात आहे; परंतु अयोध्येतही प्राचीन श्री काळेराम मंदिर असल्याची अनेकांना विशेष माहिती नाही. तथापि ज्याप्रमाणे नव्या श्रीराममंदिरात भाविक दर्शनासाठी येत आहेत, तसेच आता प्राचीन श्री काळेराम मंदिरातही दर्शनासाठी दूरदूरहून भाविक येत आहेत. या मंदिराचे माहात्म्य जाणून घेण्यासाठी श्री काळेराम मंदिराचे मुख्य पुजारी श्री. गोपाळ देशपांडे यांची भेट घेतली असता, त्यांनी संपूर्ण इतिहास कथन केला.
१. सम्राट विक्रमादित्यने स्थापन केल्या होत्या मूर्ती !
अनुमाने दीड सहस्र वर्षांपूर्वी उज्जैनच्या सम्राट विक्रमादित्य राजाने अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर अत्यंत प्रशस्त मंदिर बांधले. त्यानंतर त्याने एकाच शाळीग्राम शिळेवर असलेल्या ५ मूर्तींची विधिवत् स्थापना केली होती.
२. प्राचीन मूर्तीचे अलौकिक वैशिष्ट्य !
अखंड शाळीग्राम शिळेत बनवण्यात आलेल्या ५ मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये मध्यभागी श्रीराम, डावीकडे सीतामाता, उजवीकडे लक्ष्मण, तर एका बाजूला भरत आणि दुसर्या बाजूला शत्रुघ्न यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती पाहूनच भाविकांचा भाव जागृत होतो.
३. बाबराच्या आक्रमणापासून मूर्तीचे रक्षण करणारे संत श्री रामानंद सरस्वती !
बाबर श्रीराममंदिरावर आक्रमण करील, हे अगोदरच ओळखून येथील एक संत श्री रामानंद सरस्वती यांनी या मूर्ती शरयू नदीच्या डोहात सोडल्या. पुढे बाबराने आक्रमण करून श्रीराममंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधली.
४. २२० वर्षांनंतर शरयु नदीतून बाहेर काढलेल्या मूर्तींचे ‘काळेराम’ असे झालेले नामकरण !
या मूर्ती वर्ष १५२८ ते १७४८ या कालावधीत, म्हणजे २२० वर्षे नदीमध्येच होत्या. वर्ष १७४८ मध्ये महाराष्ट्रातील ब्राह्मण नरसिंहराव मोघे हे शरयू नदीच्या डोहामध्ये स्नान करत असतांना या मूर्ती प्राप्त झाल्या आणि त्यांनी त्या एका झाडाखाली स्थापित केल्या. मूर्ती प्राप्त होतांना त्यांच्या तोंडून जे पहिले शब्द निघाले, ते होते ‘काळे रामजी मिळाले’; म्हणून तेव्हापासून ‘काळेराम’ हे नाव विख्यात झाले.’’
५. भगवान श्रीरामाचा स्वप्नदृष्टांत !
भगवान श्रीरामाने एका भक्ताला ‘येथे माझे सतत सान्निध्य राहील’, असा स्वप्नदृष्टांत दिला होता. त्यामुळे येथील मूर्ती जागृत आहेत. आजही या मंदिरा श्रीरामाचे अस्तित्व जाणवत असल्यामुळे दर्शनाला आलेले भाविक येथे स्वतःची इच्छा किंवा मनोकामना श्रीरामापुढे मांडतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते, अशी त्यांची श्रद्धा आहे. यासाठी या मंदिरात येणार्या भाविकांची संख्या अधिक आहे. भाविकांसाठी हे मंदिर सकाळी ७ ते दुपारी १२ आणि ४.३० ते रात्री ९ या वेळेत दर्शनासाठी उघडे असते.
६. अयोध्येतील ७ प्रमुख मंदिरांमध्ये समावेश !
अयोध्येतील ७ प्रमुख मंदिरांमध्ये श्री काळेराम मंदिराचा समावेश आहे. श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिर, कनक मंदिर, राजगादी, लक्ष्मण मंदिर, महादेव मंदिर, नागेश्वर नाथ मंदिर अशी उर्वरित ६ प्रमुख मंदिरे आहेत.
– श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात, अयोध्या.
श्री मारुतीची स्त्री वेषातील मूर्ती असलेले भारतातील एकमेव मंदिर !
या मंदिरात प्रभु श्रीरामाच्या मूर्तीसमोर श्री मारुतीची स्त्री वेषातील मूर्ती आहे. हे या मंदिराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. या मूर्तीच्या कमरेला कट्यार असून पायाखाली राक्षस आहे. मारुतीरायाचे असे रूप असलेले श्री काळेराम मंदिर हे भारतातील एकमेव मंदिर आहे. ती दक्षिणाभिमुख मूर्ती आहे. त्याची दृष्टी रामाच्या चरणांवर आहे.