अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाणार नाहीत !

छायाचित्र सौजन्य : दैनिक प्रभात

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अयोध्या येथे जाणार नाहीत. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रीमंडळातील एकही मंत्री उपस्थित असणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी सूचक ट्वीट करत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या संपूर्ण मंत्रीमंडळाला घेऊन अयोध्या दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री लवकरच या दौर्‍याची माहिती घोषित करतील.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त, तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकार केले आहे. मोदी यांचे शतशः आभार ! अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी श्रीमाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा  होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासियांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार केवळ मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन श्रीरामाचे दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्या येथील दर्शनाचा दिनांक आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.