Ayodhya Flowers Under Protection : श्रीराममंदिराच्या परिसरातील सजावटीच्या फुलांनाही दिवस-रात्र ‘कडेकोट संरक्षण !’

१ सहस्र २०० ‘रक्षक’ करत आहेत फुलांच्या माळांचे रक्षण !

अयोध्या, १९ जानेवारी (वार्ता.) – अयोध्यानगरीमध्ये २२ जानेवारी या दिवशी होत असलेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंदिराचा संपूर्ण परिसर झेंडूच्या फुलांनी आकर्षकरित्या सजवण्यात आला आहे. मंदिराकडे जाणार्‍या मुख्य मार्गापासून ते मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत असलेल्या भिंतींवर झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या आहेत. अयोध्येतील ‘न्यू साकेत फ्लॉवर डेकोरेटर्स’ला हे काम देण्यात आले आहे. तथापि मंदिराच्या परिसरात असणार्‍या वानरांपासून या फुलांच्या माळांचे रक्षण करावे लागत आहे. हे कामही ‘न्यू साकेत फ्लॉवर डेकोरेटर्स’ला देण्यात आले आहे.

यासाठी ‘न्यू साकेत फ्लॉवर डेकोरेटर्स’ने १ सहस्र २०० ‘रक्षक’ नेमले असून ते हातात बेचकी घेऊन या फुलांच्या रक्षणासाठी दिवस-रात्र पहारा देत आहेत. यासाठी या रक्षकांना भिंतीवर चढून डोळ्यांत तेल घालून वानरांवर लक्ष ठेवावे लागत आहे. या रक्षकांचे जरा जरी लक्ष दुसरीकडे गेल्यास वानरांची झुंडच्या झुंड येऊन फुलांच्या माळा तोडून फुले खाऊन टाकत आहेत.

ही समस्या नाही ! – श्री. मोहीत, प्रमुख, ‘न्यू साकेत फ्लॉवर डेकोरेटर्स’

याविषयी ‘न्यू साकेत फ्लॉवर डेकोरेटर्स’चे प्रमुख श्री. मोहीत यांना विचारले असता ते म्हणाले की, ही समस्या नाही. वानरांचे ते नैसर्गिक खाद्य आहे. मंदिराच्या परिसरात सहस्रो वानरे आहेत. त्यामुळे आम्ही मुख्य सोहळा होईपर्यंत त्यांच्यापासून फुलांचे रक्षण करत आहोत. त्यासाठी आम्ही १ सहस्र २०० कर्मचारी नियुक्त केले आहेत. ही फुले अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून ती ८ दिवस टवटवीत रहातात.