श्रीरामाचे शत्रू हे जगाचे शत्रू !

कर्नाटक सरकारने ‘३०० रामभक्तांना शिक्षा करणार’, असे म्हटल्याचे प्रकरण

भारतीय संस्कृती ही जगातील ‘सर्वांत श्रेष्ठ संस्कृती’ आहे. असे असूनही हिंदु संस्कृती, सनातन धर्म यांच्या विरोधात आपल्याच देशातील लोक जे स्वतः जन्माने हिंदू आहेत, तेच हिंदु संस्कृती आणि श्रद्धास्थाने यांचे शत्रू होत आहेत, हे दुर्दैवी आहे.

आतंकवादी आणि मानवतेचे शत्रू असलेल्या विकृत मनोवृत्तीला वंदनीय मानून सभ्य, सुसंस्कृत अन् सुविद्य समाजाशी उभा दावा मांडणारे कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकार आहे; कारण कर्नाटक सरकारने ३०० रामभक्तांना शोधून शिक्षा करण्याचा चंग बांधला आहे. ‘कर्नाटक सरकारचे हे कृत्य ते केवळ रामाचेच शत्रू आहेत, हे सिद्ध करत नाहीत, तर ते संपूर्ण सभ्य जगाचे शत्रू आहेत’, हे त्यांनी स्वकर्माने सिद्ध केले आहे.

१. सदसद्विवेक जागृत नसलेल्यांकडून हिंदु धर्म आणि संस्कृती यांना विरोध !

जगातील अनेक भागात श्रीरामाविषयी श्रद्धा असलेले असंख्य लोक आढळतात. विशेष महत्त्वाचे, म्हणजे जे श्रीरामाविषयी नितांत श्रद्धा बाळगतात, ते धर्माने हिंदु नाहीत. जगातील अनेक देशांवर हिंदु धर्म, संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांचा विशेष प्रभाव असल्याचे आढळून येते. ज्याचा सदसद्विवेक जागृत आहे, अशी कोणतीही व्यक्ती हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञान यांना विरोध करू शकणार नाही. भारताचा इतिहास सांगतो की, ज्यांनी ज्यांनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांना विरोध केला, ते सारे राक्षस म्हणून ओळखले जात होते.

श्री. दुर्गेश परुळकर

२. कुठे श्रीरामाला आदर्श मानणारा इस्लामी देश इंडोनेशिया आणि कुठे रामभक्तांवर शिक्षेचा बडगा उगारणारे कर्नाटक सरकार !

रामायणातील एक प्रसंग

आज जगातील विविध देशांकडे आपण सहज जरी दृष्टीक्षेप टाकला, तरी श्रीराम ही केवळ हिंदूंची देवता आहे, असे आपण म्हणू शकत नाही. हिंदु धर्म ज्यांनी स्वीकारलेला नाही, असे अनेक अन्य धर्माचे अनुयायी हिंदु धर्म आणि संस्कार यांकडे ज्ञानदृष्टीने पहातात; कारण त्यांच्यात सुसंस्कृतपणा असून चांगल्या गोष्टी जाणून घेण्याची बौद्धिक क्षमता आहे, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

आपल्या देशाच्या पूर्वेकडे असलेला इंडोनेशिया हा देश जगातील सर्वांत मोठा इस्लामी देश आहे. या देशाच्या राष्ट्रीय आकाशवाणीवरून प्रतिदिन ‘श्री रामायण’ सांगितले जाते. आपल्याकडे जसे रामलीलाचे प्रयोग होतात, तसेच प्रयोग इंडोनेशियात होतात. त्यात सहभाग घेणारे सर्व कलाकार धर्माने मुसलमान आहेत, असे आढळून येते. त्यांना श्रीरामाविषयी नितांत अभिमान, श्रद्धा आणि भक्तीभाव आहे. ‘श्रीरामाचा जयजयकार केल्यावर आपल्या इष्ट देवतेचा अपमान होतो’, असे त्यांना वाटत नाही.

इंडोनेशियात हिंदूंची संख्या केवळ १.७४ टक्क्यांच्या आसपास आहे. या देशावर हिंदु धर्माचा प्रभाव असल्याचे आढळून येते. इंडोनेशियाचा अर्थ ‘भारतीय द्वीप’ असा आहे. ‘जकार्ता’ ही इंडोनेशियाची राजधानी असून तिचे मूळचे नाव ‘जयकर्ता’ असे आहे. इंडोनेशियात ‘जकार्ता (जयकर्ता)’ आणि ‘योगकर्ता’ हे २ प्राचीन प्रांत आढळतात. विशेष महत्त्वाचे, म्हणजे आजही त्या प्रांताचे नाव ‘योगकर्ता’ हेच आहे. इंडोनेशिया देशातील जनतेला श्रीराम स्वतःचे वाटतात. त्यांची श्रीरामावर श्रद्धा आहे. दुर्दैवाने आपल्या देशातील कर्नाटक सरकारच्या मनात श्रीरामाविषयी श्रद्धाभाव नाही; म्हणूनच कर्नाटक सरकारने ३० वर्षांपूर्वी कारसेवक म्हणून ज्यांनी योगदान दिले, त्यांना आज सूडभावनेने वागवले जाते.

३. थायलंड, मलेशिया आणि दक्षिण कोरिया येथे असलेली रामभक्ती अन् कंबोडियामध्ये असलेला हिंदु धर्माचा पगडा !

विविध देशांमध्ये ‘रामायण’ 

अ. थायलंड : हा देश बौद्ध धर्मीय असूनही त्या देशात रामकथा आणि श्री रामायण यांना विशेष महत्त्व आहे. एवढेच नाही, तर थायलंडच्या सरकारने रामायणाला राजाश्रय दिला आहे. तेथील राज्यांनी रामायणाची पद्यमय भाषांतरे करवून घेतली आहेत, तसेच बौद्ध मंदिरांच्या भिंतींवर रामायणातील दृश्य रंगवण्यात आली आहेत. थायलंडमधील चक्री राजवंश स्वतःला अभिमानाने ‘राम’ म्हणून घेतो. थायलंडचे राष्ट्रीय प्रतीक गरुड आहे. थायलंडच्या राजाला ‘भगवान विष्णूचा अवतार’ मानले जाते. थायलंडचा विद्यमान राजा वजिरालोंगकोर्न ‘राजा राम १० वा’ या नावाने ओळखला जातो. याचा अर्थ थायलंडमध्ये १० पिढ्यांपूर्वी स्वतःला ‘राम’ ही उपाधी लावणारे चक्रीवंशीय राजे होते. थायलंडच्या रिझर्व्ह बँकेचे पूर्वीचे नाव ‘बँक ऑफ अयोध्या’ असे होते.

आ. मलेशिया : हे इस्लामी राष्ट्र असूनही त्या राष्ट्रात नौसेनाधिपतीची पदवी ‘लक्ष्मण’ नावाची आहे. डॉ. नोरिया महंमद म्हणतात, ‘‘रामायणात आज्ञापालन, कौटुंबिक प्रेमभाव, उत्कट मैत्रीचे सद्गुण दिसतात. त्यामुळे मलेशियन जनतेला रामायणाचे महत्त्व वाटते.’’

इ. दक्षिण कोरिया : सर्वांत आश्चर्याचे, म्हणजे दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्रपती असलेल्या पार्क ग्युन हाय या स्वतः ‘रामाच्या वंशा’तील असल्याचे अभिमानाने सांगतात. तेथे हिंदु मंदिरे मोठ्या प्रमाणात आढळतात. तिथे राधाकृष्णाचे मंदिर बांधण्यात आले आहे.

ई. कंबोडिया : या देशात अंकोरवाट येथे जगातील सर्वांत मोठे धार्मिक मंदिर आहे. हे मंदिर १६२.६ चौरस हेक्टर क्षेत्रात उभारण्यात आले आहे. कंबोडियातील अंकोरचे प्राचीन नाव ‘यशोधरपूर’ आहे. कंबोडियाचा सम्राट सूर्यवर्मन दुसरा याने त्याच्या शासकीय कालखंडात (वर्ष १११२ ते ११५३) जगातील या सर्वांत मोठ्या मंदिराच्या बांधकामाला आरंभ केला. या संपूर्ण मंदिराचे बांधकाम होण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्यामुळे त्याचा भाचा धरणीन्द्रवर्मन याने हे मंदिर बांधून पूर्ण केले. कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर हे मंदिर अंकित करण्यात आले आहे. हे मंदिर, म्हणजे मेरुपर्वताचे प्रतीक आहे. या मंदिराच्या भिंतीवर समुद्रमंथनाचे चित्र रेखाटण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर बळी आणि वामन, स्वर्ग अन् नरक, देव आणि दानव युद्ध, महाभारतातील दृश्य, ‘हरिवंश’ या पुराणातील कथेला अनुसरून असलेली शिल्पे रामायणातील काही चित्रही रेखाटण्यात आली आहेत. तेथे सुवर्णमृगाची शिकार करणार्‍या श्रीरामाचे, सुग्रीव आणि वाली यांच्या युद्धाचेही तिथे शिल्प आढळते. ‘युनेस्को’ने या मंदिराला ‘विश्ववारसा’ म्हणून गौरवले आहे.

या विदेशातील राज्यकर्त्यांना श्रीरामाविषयी नितांत भक्तीभाव आहे. ‘श्रीरामाचे वंशज’ म्हणून घेण्यात त्यांना अभिमान वाटतो. आपल्याच देशातील काही राजकीय नेत्यांना ‘राम’ नावाचा उच्चार करणे सुद्धा पाप आणि भयंकर मोठा अपराध वाटतो.

४. विविध देशांमध्ये हिंदु धर्म, ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांना आदर्श मानण्यात येणे

जगातील विविध देशांतील राजकीय नेते आणि राज्यकर्ते श्रीरामाविषयी अभिमान बाळगतात. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ हे त्यांना आदर्श ग्रंथ वाटतात. श्रीराम त्यांना काल्पनिक वाटत नाही. ‘श्रीराम ऐतिहासिक पुरुष असून वंदनीय आणि अनुकरणीय आहे’, अशी त्यांची श्रद्धा आहे. अशी श्रद्धा बाळगतांना त्यांच्या मनात संकुचित भाव निर्माण होत नाही. रामायण आणि महाभारत या २ महाकाव्यांचा प्रभाव जगातील विविध भागांवर असल्याचे आढळून येते. ‘द आर्यन रेसेस इन पेरु’, या ग्रंथाचे स्पॅनिश लेखक लोपेज यांनी संशोधन करून असा निर्वाळा दिला आहे, ‘पेरूतील काव्याच्या प्रत्येक पानावर रामायण आणि महाभारत यांचा ठसा उमटलेला दिसतो.’

युरोपात ग्रीक विद्वान हिंदु तत्त्वज्ञानाने प्रभावित झाले होते, असे आढळून येते. त्याचा दाखला, म्हणजे डिमेट्रियस गॅलियानॉस याने ‘भगवद्गीते’चा ग्रीक भाषेत अनुवाद केला आहे.

५. …असे लोक अखिल सभ्य समाजाचे शत्रू !

भारतासारख्या पुण्यभूमीत जन्माला येऊन आणि श्रीरामाच्या पदस्पर्शाने अन् वास्तव्याने पुलकित झालेली भूमी जन्महिंदूंना शापित वाटते. श्रीरामाविषयी अभिमान बाळगणे, ही त्यांना धर्मांधता वाटते. ‘असे लोक केवळ रामाचे शत्रू नसून अखिल सभ्य समाजाचे शत्रू आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.  (४.१.२०२४)