ED Raids Jharkhand : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सहकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या घरांवर ‘ईडी’च्या धाडी !

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन

रांची (झारखंड) : झारखंडमधील बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित अवैध आर्थिक व्यवहार (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) रांची आणि राजस्थान येथील १० ठिकाणी धाडी घातल्या. यांत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रसारमाध्यम सल्लागार अभिषेक प्रसाद यांचाही समावेश आहे. याखेरीज हजारीबागचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र दुबे आणि साहिबगंजचे उपजिल्हाधिकारी राम निवास यांच्यावरही कारवाई झाली आहे.

(सौजन्य : Republic World)

मुख्यमंत्री सोरेन यांच्यावर खाण प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप !

खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाचे दायित्व असतांना हेमंत सोरेन यांनी वर्ष २०२१ मध्ये स्वतःसाठी खाण भाडेतत्त्वावर (‘लीज’वर) घेऊन निवडणूक नियमांचे उल्लंघन केले आहे, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला; परंतु सोरेन यांनी हा आरोप नाकारला आहे. आदिवासी नेत्याला त्रास देण्याचे हे षड्यंत्र असल्याचे ते म्हणाले. (भ्रष्टाचार अंगलट आल्यावर प्रत्येकाला जात, धर्म आदी आठवतात आणि त्याच्या आधारे स्वतःला निरपराध ठरवण्याचा ते प्रयत्न करतात ! – संपादक)

भूमी घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात, ‘ईडी’ने सोरेन यांना सातव्यांदा समन्स बजावले होते. या समन्सनुसार सोरेन यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती; परंतु सोरेन यांनी या समन्सला ‘बेकायदेशीर’ म्हटले आहे. ‘ईडी’कडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही सोरेन यांनी केला.