श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील ४०० कर्मचारी २५ डिसेंबरपासून संपावर !
मंदिर कर्मचार्यांच्या काही मागण्या१. सर्व कामगारांचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार हुद्दा आणि पदनिश्चिती करा. २. १ ऑक्टोबर २००३ च्या करारानुसार पाचव्या वेतन श्रेणीप्रमाणे वर्ष २००३ ते २०२३ पर्यंतचा फरक अदा करून मागील फरकासह सर्व कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करा. ३. कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत समाविष्ट करून घ्या. ४. सर्व कामगारांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा विनामूल्य करा. ५. कोरोना महामारीत मरण पावलेल्या कामगारांच्या वारसांना हानीभरपाई द्या. मयत कामगारांच्या घरातील एका व्यक्तीला देवस्थानच्या सेवेत समाविष्ट करून घ्या. ६. प्रॉव्हिडंट फंड कायद्याची काटेकोरपणे कार्यवाही करा. ७. देवस्थानच्या कर्मचार्यांकडून चुकीचे वर्तन घडल्यास किंवा तसे आढळून आल्यास सदर कर्मचार्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी सदर कर्मचार्यांची समितीच्या वतीने चौकशी करावी. त्या चौकशी समितीमध्ये कामगार युनियनचे २ संचालक प्रतिनिधी असावेत. ८. कामगारांच्या सेवानिवृत्तीच्या वयाचा कालावधी ५८ वरून ६० वर्षे करा. |
अहिल्यानगर – अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदनिश्चिती करावी, कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यांसह विविध १० मागण्या शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचार्यांनी केल्या होत्या. त्यातील किरकोळ मागण्या या देवस्थान ट्रस्टकडून पूर्ण करू, असे आश्वासन देण्यात आले आहे; मात्र मुख्य २ मागण्या मान्य होत नसल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. विविध १० मागण्यांसाठी त्यांनी संपाची चेतावणी दिली होती. याविषयी देवस्थान ट्रस्टसमवेत कर्मचार्यांची ४ वेळा बैठक झाली; मात्र चारही वेळा बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील ४०० कर्मचार्यांनी २५ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे सुट्यांच्या निमित्ताने शनिशिंगणापूर येथे येणार्या भाविकांची असुविधा होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात देवस्थानच्या कामगार युनियनच्या वतीने देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात २५ मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी १० मागण्यांवर कर्मचारी ठाम आहेत.
संपादकीय भूमिकामंदिरांचे सरकारीकरण का नको, हे दर्शवणारी घटना ! कर्मचार्यांनी संप करायला हे मंदिर आहे कि कारखाना ? |