नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – भूमाफियांनी सरकारची भूमी लाटली असल्याचे अनेक प्रकार झाले असल्याची स्वीकृती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली. हे प्रकार रोखण्यासाठी महसूल विभागाची पुनर्रचना करण्याची आवश्यकता या वेळी विखे पाटील यांनी व्यक्त केली.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील म्हारळ येथील संरक्षण विभागासाठी सरकारने ७० हून अधिक शेतकर्यांकडून ८३ एकर भूमी घेतली. या भूमीवर प्रकल्प झाला नसल्याचे लक्षात आल्यावर या शेतकर्यांपैकी २१ जण आणि या भूमीशी संबंधित नसलेल्या काही लोकांनी एकत्र येऊन सरकारकडून १ वर्षासाठी कसण्यासाठी घेतली. एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ न करता ही भूमी परस्पर विकासकाला विकून कोट्यवधी रुपये कमावल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला.
या वेळी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे म्हणाल्या की, त्यांच्या जिल्ह्यामध्ये बनावट कागदपत्रे सिद्ध करून सरकारची भूमी लाटण्याचे प्रकार चालू आहेत. यासाठी ‘रॅकेट’ कार्यरत आहे. यावर उत्तर देतांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्ताद्वारे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू’, असे आश्वासन दिले.
अशा प्रकारांमुळे सामान्यांची पिळवणूक होत आहे. प्रांताधिकारी, भूमी अभिलेख, आयुक्त आदी विविध स्तरांवर ही प्रकरणे निर्णयासाठी येत आहेत. महसूल विभागाची अशी प्रकरणे विविध स्तरांवर चालवली जात असल्यामुळेच यामध्ये भ्रष्टाचार वाढत आहे. त्यामुळेच महसूल विभागाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. याविषयी कोकण विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या ४-५ बैठका झाल्या आहेत. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील अधिवेशनात याविषयीचे निश्चित धोरण सभागृहात मांडण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री विखे पाटील यांनी दिले.