करणी सेनेचे अध्यक्ष गोगामेडी यांच्या हत्येत भारतीय सैनिकाचा समावेश !

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी

जयपूर (राजस्थान) – येथे राष्ट्रीय श्री राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येतील २ आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली असून त्यांच्या शोधासाठी पोलीस उत्तरप्रदेश, पंजाब आणि मध्यप्रदेश येथे गेले आहेत. या दोघांपैकी निखिल फौजी नावाचा एक आरोपी असून तो भारतीय सैन्याचा सैनिक असल्याचे उघड झाले. तो सुटीसाठी घरी आला असतांना त्याने ही हत्या केली. तो हरियाणाचा रहाणारा आहे.

आरोपींनी गोगामेडी यांच्याकडे घेऊन जाणार्‍या मित्रालाही ठार मारले !

गोगामेडी यांची हत्या करणारे मारेकरी हे जयपूरमधील कापड व्यापारी नवीन शेखावत यांच्या समवेत त्यांच्या मावशीच्या मुलाच्या विवाहाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने गोगामेडी यांच्या घरी गेले होते. नवीन शेखावत करणी सेनेचे सदस्य होते. दोन्ही आरोपी मित्र म्हणून नवीन समवेत गेले होते. दोघा मारेकर्‍यांनी गोगामेडी यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्यांनी नवीन यांनाही ठार मारले. त्यांनी नवीन यांना का ठार मारले ?, याचा पोलीस शोध घेत आहेत.

पंजाब पोलिसांनी राजस्थान पोलिसांना आक्रमणाच्या कटाची ८ मासांपूर्वी दिली होती माहिती !

विशेष म्हणजे पंजाब पोलिसांनी गोगामेडी यांच्यावर आक्रमण करण्याच्या कटाची माहिती ८ मासांपूर्वीच राजस्थान पोलिसांना दिली होती. त्यानंतरही गोगामेडी यांना पोलिसांनी संरक्षण दिले नव्हते. (यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांवरही सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

अनेक ठिकाणी निदर्शने !

आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय श्री राजपूत करणी सेनेने ६ डिसेंबरला ‘राजस्थान बंद’ची घोषणा केली होती. याला जयपूरमधील व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला. यासह जैसलमेर आणि बारमेर येथेही बंदची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी निदर्शने करत बंद पाळण्यात आला.