Sindhudurg Fort Foundation Day : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी सोहळ्याच्या वर्धापदिनानिमित्त मोरयाचा धोंडा येथे शासकीय पूजा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने मालवण किनारपट्टी दुमदुमली !

मालवणच्या सिंधदुर्ग किल्ल्याची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली ते स्थान, ‘मोरयाचा धोंडा’ !

मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी सोहळ्याचा वर्धापनदिन सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मोरयाचा धोंडा, दांडी येथे २५ नोव्हेंबर या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंत्री चव्हाण यांच्या हस्ते ‘मोरयाचा धोंडा’ या ठिकाणी शासकीय पूजा करण्यात आली. या वेळी शिवछत्रपतींच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

२५ नोव्हेंबर १६६४ या दिवशी मोरयाचा धोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे विधीवत् भूमीपूजन केले होते. शेकडो वर्षांनंतर या ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या स्थानाचा कायापालट होणार आहे. शेकडो वर्षे उघडे असलेल्या या ‘मोरयाचा धोंडा’वर आता छत्र उभारण्यात येणार आहे. येथे ‘म्युझियम’ होणार असून यामध्ये छत्रपतींच्या विविध आठवणींबरोबरच सिंधुदुर्ग किल्ला निर्माण होत असतांनाच्या अनेक संस्मरणीय नोंदी, तसेच इतिहास असणार आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. या वेळी माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अन्य उपस्थित होते.

रवींद्र चव्हाण यांनी २५ नोव्हेंबरला नौसेना दिनाच्या कार्यक्रमाचा, तसेच मालवण, तारकर्ली आणि राजकोट किल्ला येथे चालू असलेल्या कामांची पहाणी करून आढावा घेतला.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरही शासकीय पूजा झाली पाहिजे ! – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

या वेळी मंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘छत्रपतींच्या काळातील प्रथापरंपरा आजही काही ठिकाणी तशाच चालू ठेवल्या आहेत. रायगडावरसुद्धा अशा प्रकारच्या प्रथा परंपरा चालू आहेत. पायथ्याशी असलेल्या मंदिरात शासकीय पद्धतीने पूजा होते. सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात प्रतिदिन होणार्‍या पूजेसाठी शासकीय यंत्रणांकडून आवश्यक ते सहकार्यही उभे केले जाईल. येथेही शासकीय पूजा होणे अपेक्षित आहे. सरकार कुणाचेही असो; परंतु सरकारने या सर्व भूमिकेकडे एक वेगळ्या नजरेने पहाणे आवश्यक आहे. छत्रपतींचा आदर्श घेऊन देशवासियांचे रक्षण करणार्‍या नौसेनेचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान मालवणमध्ये येत आहेत. आपणही सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहूया.

( सौजन्य : सह्याद्रीच्या गडवाटा)

क्षणचित्रे

१. मोरयाचा धोंडा देवस्थानाची नियमितपणे पूजाअर्चा, तसेच येथे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करणारे या परिसरातील नागरिक आणि मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

२. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भूमीपूजनाचे पौरोहित्य करणार्‍या अभ्यंकर कुटुंबियांच्या आताच्या सहाव्या पिढीतील विलास अभ्यंकर यांनीच आजच्या कार्यक्रमाचे पौरोहित्य केले. त्यांचा सत्कार करण्यात आला.

३. छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी असलेल्या हिरोजी इंदुलकर यांच्या कुटुंबातील तेरावे वंशज श्रीनिवास इंदुलकर यांचा सत्कार करण्यात आला.