Law Against Deepfake : ‘डीपफेक व्हिडिओ’च्या विरोधात लवकरच कायदा होणार !

खोट्या बातम्या प्रसारित होऊ न देण्याचे दायित्व सामाजिक माध्यमांचेच !

(डीपफेक व्हिडिओ म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानाद्वारे व्यक्तीच्या तोंडावळ्यात पालट करून फसवणूक करणे)

‘डीपफेक’ एक डोकेदुखी !

नवी देहली : ‘डीपफेक व्हिडिओ’, तसेच बनावट बातम्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्रशासनाने कंबर कसली आहे. २३ नोव्हेंबर या दिवशी शासनाने फेसबूक, एक्स, इन्स्टाग्राम यांसारख्या प्रमुख सामाजिक माध्यमांच्या आस्थापनांच्या उच्चाधिकार्‍यांसमवेत बैठक आयोजित केली होती. या वेळी शासनाने ‘डीपफेक व्हिडिओ’, सिंथेटिक व्हिडिओ (मूळ चित्र पालटून बनवलेले व्हिडिओ) आणि खोटे वृत्त प्रसारित करणार्‍या वापरकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर त्यास सामाजिक माध्यमेच उत्तरदायी असतील. यासंदर्भात कठोर कायद्यासाठी सिद्ध रहावे’, असे स्पष्ट मत व्यक्त केले. यासंदर्भात पुढील महिन्यात कायदाही करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी दिली.

(सौजन्य : Oneindia Hindi | वनइंडिया हिंदी) 

केंद्रीय मंत्री वैष्णव पुढे म्हणाले की,

१. हा कायदा असा असेल, ज्यातून सामाजिक माध्यमे अथवा वापरकर्ते कोणतीही पळवाट काढू शकणार नाहीत.

२. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक बैठक घेऊन सर्व बाजूंनी चर्चा करून नियम सिद्ध केले जातील.

३. सरकार नवीन कायद्यात आशय पडताळणी प्रणालींचा (‘टूल्स’चा) वापर अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. यातून एखादा व्हिडिओ कृत्रिम पद्धतीने सिद्ध केला किंवा नाही, याची निश्‍चिती करता येऊ शकेल.

‘एआय’वर आळा घालण्यासाठी नियामक संस्थेची आवश्यकता ! – वैष्णव

‘एआय’च्या (कृत्रिम बुद्धीमत्तेच्या) तंत्रज्ञानाच्या वापराचे नियमन करण्यासाठी  नियामक संस्था असली पाहिजे. ‘एआय’च्या क्षेत्रात सामाजिक माध्यमांचे स्वनियमन अथवा सरकारी नियमन यांचा अधिक परिणाम होणार नाही. ‘एआय’साठी सर्व पैलूंवर दृष्टी ठेवू शकेल, अशी संस्था स्थापन व्हायला हवी.

हे वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळेच नियमांतही गतिशीलता असली पाहिजे. एकदा कायदा सिद्ध केल्यानंतर सामाजिक माध्यमांची आस्थापने आणि बनावट वापरकर्ते यांच्याकडून त्यात पळवाटा काढण्याची भीती असते. अमेरिका आणि चीन येथे याविरोधात प्रयत्न करण्यात आले; पण त्यांनाही हे रोखता आलेले नाही. त्यामुळेच भारत सरकार एका नियामक संस्थेच्या स्थापनेचा विचार करत आहे.

४. ‘डीपफेक व्हिडिओ’ पकडल्यानंतर ३६ घंट्यांत तो संबंधित सामाजिक माध्यमांवरून हटवला गेला नाही, तर ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत ‘इंटरमीडिएट’ची सुविधा संपुष्टात आणली जाऊ शकते.

५. गूगल किंवा ‘अ‍ॅपल प्लेस्टोअर’वर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणारे ‘अ‍ॅप्स’ही उपलब्ध होता कामा नयेत. यासंदर्भातही कायद्यात तरतूद असेल.

६. खोटा मजकूर (फेक कंटेंट) रोखण्याचे काम सामाजिक माध्यमांना त्यांच्या स्तरावर करावे लागेल.