सी.आर्.झेड. क्षेत्रांतर्गत राजापूर येथे बजावण्यात आलेल्या नोटिसा रहित कराव्यात !

आमदार राजन साळवी यांची प्रशासनाकडे मागणी

राजन साळवी

राजापूर – तालुक्यातील सागरी किनारपट्टीवरील बांधकाम करतांना सी.आर्.झेड. (किनारपट्टी नियमन क्षेत्र) कायद्यातील नवीन सुधारित अधिसूचनेनुसार कोणतेही कायद्याचे उल्लंघन झालेले नाही. त्यामुळे किनारपट्टीच्या पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन आणि सी.आर्.झेड. क्षेत्रांतर्गत तालुक्यातील सागरी किनारपट्टीवरील गावांमधील लोकांना बजावण्यात आलेल्या नोटिसा तात्काळ रहित कराव्यात, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी उपविभागीय अधिकार्‍यांकडे केली आहे.

प्रशासनाने सी.आर्.झेड. कायद्यांतर्गत कारवाई करण्याविषयी नोटिसा बजावल्या आहेत.

राजापूर तालुक्यातील सागरी किनारपट्टी आणि खाडीकिनार्‍यावरील डोंगर, धाऊलवल्ली, तुळसुंदे, अनंतवाडी, आगरवाडी, चव्हाटावाडी, जुवे, जैतापूर, बाजारवाडी, होळी, दळे, इंगळवाडी, कुंभवडे, अणसुरे, आंबोळगड, साखरीनाटे, पडेल, बाकाळे, बेनगवाडी, दांडेवाडी आदी गावांमधील अनेक कुटुंबे पिढ्यान्‌पिढ्या कायमस्वरूपी बांधकामे करून वास्तव्य करत आहेत. अशा सहस्रोंहून अधिक लोकांना प्रशासनाने सी.आर्.झेड. कायद्यांतर्गत कारवाई करण्याविषयी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या नोटिसांविरोधात लढा देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी आमदार साळवी यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये केला होता. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी आमदार साळवी यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे संबंधित नोटिसा रहित कराव्यात वा त्याविषयी पुनर्विचार व्हावा, अशी मागणी महसूल प्रशासनाकडे केली आहे.