महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथमच गोवा येथे पार पडले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना’ या विषयावर दोन दिवसांचे शिबिर !

‘नाहं वसामि वैकुण्ठे योगिनां हृदये न च । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ।।’, म्हणजे श्रीमन्नारायण देवर्षि नारदांना सांगतो, ‘‘हे नारदा, माझा निवास वैकुंठ नाही किंवा योगिजनांच्या हृदयातही नाही, तर जेथे श्रद्धापूर्वक गायनाद्वारे मला भजले जाते, तेथे मी निवास करतो.’ या उक्तीप्रमाणे गायन, वादन, नृत्य आणि एकूण सर्वच कला यांचा उद्देश ‘ईश्वरप्राप्ती’ हाच आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’, या उद्देशाने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना झाली आहे. ‘हा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोचावा’, यासाठी ७ ते ९.१०.२०२३ या कालावधीत गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रामध्ये ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना’ या २ दिवसांचे निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

डावीकडून श्री. प्रदीप चिटणीस, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि दीपप्रज्वलन करतांना पं. संजय मराठे

१. शिबिराला उपस्थित मान्यवर

या शिबिराला ठाणे येथील शास्त्रीय गायक पं. संजय मराठे  (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के),श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), डोंबिवली (ठाणे) येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी, तसेच श्री. चिटणीस यांचे एकूण २५ विद्यार्थी उपस्थित होते.

बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा पात्रीकर या त्यांच्या विद्यार्थिनींच्या समवेत एक दिवस या शिबिराला उपस्थित राहिल्या. गोवा येथील बासरीवादक श्री. रोहित वनकर, त्यांच्या पत्नी शास्त्रीय गायिका सौ. सूरमयी वनकर, शास्त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर आणि तबलावादक श्री. रुद्राक्ष वझे यांचीही या शिबिरात एक दिवस उपस्थिती होती.

२. शंखनाद आणि दीपप्रज्वलन यांनी शिबिराचा झालेला प्रारंभ !

शंखनादाने प्रारंभ झालेल्या शिबिराचे उद्घाटन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पं. राम मराठे यांचे ज्येष्ठ चिरंजीव पं. संजय मराठे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. आरंभी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिका सौ. अनघा शशांक जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, बी.ए. संगीत) यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ओळख करून दिली आणि विश्वविद्यालयाच्या कार्याची माहिती सांगितली.

३. ‘संगीताच्या माध्यमातून साधना’, या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन !

शिबिरात मार्गदर्शन करतांना सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई

त्यानंतर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, संगीत विशारद) यांनी विश्वविद्यालयाच्या संगीत आणि नृत्य यांतील संशोधनात्मक कार्याची ओळख करून देऊन ‘संगीताच्या माध्यमातून कशा प्रकारे साधना करता येऊ शकते ?’, या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचालन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे तबलावादक साधक श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी केले.

४. ‘आध्यात्मिक स्तरावर संगीत कसे अनुभवायचे ?’, हे शिकवण्यासाठी करण्यात आलेले संशोधनात्मक प्रयोग

शिबिरात ‘संगीत हे बाह्य कानांनी न ऐकता आध्यात्मिक स्तरावर कसे अनुभवायचे ?’, हे शिकण्याच्या दृष्टीने ‘बासरी आणि तबला यांवर राग ‘यमन’ ऐकणे’ अन् ‘बासरी आणि तबला यांच्या साथीने ‘यमन’ या रागाचे शास्त्रीय गायन ऐकणे’, हे दोन संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले.

गोवा येथील बासरीवादक श्री. रोहित वनकर आणि तबलावादक श्री. योगेश सोवनी यांचा पहिला प्रयोग झाला. त्यानंतर शास्त्रीय गायक पं. संजय मराठे आणि श्री. प्रदीप चिटणीस यांच्या समवेत बासरीवादक श्री. रोहित वनकर, तबलावादक श्री. योगेश सोवनी आणि हार्माेनियमवर

सौ. सुरमयी वनकर यांचा दुसरा प्रयोग झाला. दोन्ही प्रयोगांच्या वेळी शिबिराला उपस्थित असणार्‍या काही जणांची भावजागृती झाली.

४ अ. प्रयोगांच्या वेळी शिबिरार्थींना कृष्णतत्त्वाशी संबंधित आलेल्या अनुभूती

४ अ १. श्री. संतोष पाटील, भिवंडी, जिल्हा ठाणे : ‘गायन आणि वादन एकत्रित ऐकतांना वृंदावनासारखे वातावरण निर्माण झाले होते. बराच वेळ मी त्याच अवस्थेत होतो. मला ‘बराच वेळ याच अवस्थेत रहावे, अन्य काही बोलू नये’, असे वाटत होते.’

४ अ २. सौ. अनुश्री वाघे, ठाणे : ‘बासरीवादन करणारे श्री. रोहित वनकर यांचे हात मला निळ्या रंगाचे दिसले. ‘जणू प्रत्यक्ष श्रीकृष्णच बासरीवादन करत आहे’, असे मला जाणवले. वादनानंतर माझी भावजागृती झाली.’

४ अ ३. सौ. कल्पना कुलकर्णी, चरई, ठाणे : ‘कृष्णानदीच्या तिरावर आमचे श्रीकृष्णाचे मंदिर आहे. मला तेथील वातावरणाची प्रकर्षाने आठवण आली आणि श्रीकृष्णाच्या आठवणीने माझी भावजागृती झाली.’

४ आ. प्रयोगानंतर संगीत प्रयोगांतील सूक्ष्म घडामोडींचे परीक्षण सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी सांगितले.

५. शिबिरात सादर करण्यात आलेले प्रमुख विषय

अ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने गायन, वादन आणि नृत्य यांचा व्यक्तीच्या प्रभावळीवर होणारा परिणाम अभ्यासला असून आतापर्यंत त्याविषयी ७०० हून अधिक संशोधनात्मक प्रयोग केले आहेत. भारतीय कलांची सात्त्विकता दर्शवणार्‍या संशोधनपर विविध प्रयोगांची चलचित्रेही (‘व्हिडिओ’ही) शिबिरार्थींना दाखवण्यात आली.

आ. ‘कलेच्या माध्यमातून साधना कशी करायची ?’, याविषयी शिबिरार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’, तसेच ‘भाववृद्धीसाठी करण्याचे प्रयत्न’, या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले.

इ. या वेळी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या आणि मूलतः सात्त्विकतेची आवड असणार्‍या दैवी बालकांविषयी माहिती देण्यात आली, तसेच सनातनचे दुसरे बाल संत पू. वामन राजंदेकर (वय ६ वर्षे) आणि काही अन्य दैवी बालके यांची ओळखही या वेळी शिबिरात करून देण्यात आली.

ई. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील संगीत, नृत्य आणि नाट्य या माध्यमांतून साधनारत असलेल्या काही साधकांनी ते करत असलेल्या कलांविषयीच्या सूक्ष्म अभ्यासाविषयी माहिती दिली, तसेच त्यांना कलेच्या माध्यमातून साधना करतांना आलेल्या अनुभूतीही या वेळी सांगितल्या.

उ. संगीताला अध्यात्माची जोड देऊन संतपद प्राप्त केलेले प्रसिद्ध बासरीवादक पू. केशव गिंडे यांची श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत या वेळी दाखवण्यात आली. यातून ‘कलाकाराने कलेला साधनेची जोड दिल्यावर त्याच्या जीवनात कोणता सकारात्मक दैवी पालट होतो ?’, हे शिबिरार्थींच्या लक्षात आले आणि त्यांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य झाले.

ऊ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली भावपूर्णरित्या म्हटलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप शिबिरात १० मिनिटे ऐकवण्यात आला. ‘हा नामजप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी किती सूक्ष्म बारकाव्यांसहित सुश्री (कु.) तेजल यांना शिकवून त्यांच्याकडून म्हणून घेतला’, याविषयी या वेळी सांगण्यात आले.

ए. शिबिराच्या समारोपाच्या वेळी या दोन दिवसांच्या शिबिराच्या क्षणचित्रांचे एक छोटे चलचित्र (‘व्हिडिओ’) सगळ्यांना दाखवण्यात आले. त्यामुळे सगळ्यांच्या शिबिराविषयीच्या स्मृतींना उजाळा मिळाला.’

संकलक : सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१०.१०.२०२३)

(क्रमशः)

भाग २ : https://sanatanprabhat.org/marathi/733934.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.