‘नाहं वसामि वैकुण्ठे योगिनां हृदये न च । मद़्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥’, म्हणजे श्रीमन्नारायण देवर्षि नारदांना सांगतो, ‘‘हे नारदा, माझा निवास वैकुंठ नाही किंवा योगिजनांच्या हृदयातही नाही, तर जेथे श्रद्धापूर्वक गायनाद्वारे मला भजले जाते, तेथे मी निवास करतो.’ या उक्तीप्रमाणे गायन, वादन, नृत्य आणि एकूण सर्वच कला यांचा उद्देश ‘ईश्वरप्राप्ती’ हाच आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’, या उद्देशाने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना झाली आहे. ‘हा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोचावा’, यासाठी ७ ते ९.१०.२०२३ या कालावधीत गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रामध्ये ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना’ या २ दिवसांचे निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २७.१०.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘शिबिराचे उद़्घाटन, शिबिरात सादर करण्यात आलेले प्रमुख विषय’ आदी भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.
(भाग २)
भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/731876.html
६. क्षणचित्रे
अ. ‘संगीत प्रयोगानंतर सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी प्रयोगांचे सूक्ष्म परीक्षण सांगितले. तेव्हा ‘एक वेगळेच विश्व अनुभवता आले’, असे सगळ्यांनीच सांगितले. काही जण म्हणाले, ‘‘आम्हीही असे काहीतरी अनुभवले; पण ‘ते शब्दांत कसे मांडायचे ?’, हे आम्हाला कळत नव्हते. आता या दोघांचे परीक्षण ऐकल्यावर आम्हाला ते कळले.’’
आ. ‘बाहेरच्या कार्यक्रमांमध्ये बाह्य गोष्टींकडे, म्हणजे सूर, ताल आणि लय यांकडे लक्ष देत संगीत ऐकतात; परंतु या प्रयोगांच्या वेळी ‘भावजागृती होणे, मन निर्विचार होणे, श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे’, अशा बर्याच अनुभूती शिबिरार्थींना आल्या. त्यामुळे ‘स्थुलातील संगीत ऐकण्यापेक्षा सूक्ष्मातील अनुभूती कशा अनुभवायच्या ?’, हे आम्ही आज या प्रयोगांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवले’, असे मनोगत शिबिरार्थींनी व्यक्त केले.
इ. बासरीवादक श्री. रोहित वनकर आणि त्यांची पत्नी गायिका सौ. सूरमयी वनकर हे दोघेही बासरीवादनाच्या प्रयोगानंतर अतिशय भारावून गेले. त्यांनीही त्यांना प्रयोगाच्या वेळी आलेल्या अनुभूती सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘आम्ही दोघे साधनेसाठी प्रत्येक शनिवार आणि रविवार येथे येणार आहोत.’’
ई. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, हा विषय ऐकल्यावर अनेकांनी त्याविषयीची सूत्रे लिहून घेतली. त्यांनी याविषयी जिज्ञासेने प्रश्न विचारले. या सत्राच्या वेळी काहींनी स्वतःच्या चुका आणि स्वभावदोष प्रांजळपणे अन् उत्स्फूर्तपणे सांगितले. तसे बघायला गेले, तर सामान्यांना हा विषय समजायला कठीण जातो; परंतु ‘शिबिरार्थींनी या विषयाचा स्वतःला होणार असलेला लाभ ओळखून हा विषय समजून घेतला’, हे विशेष कौतुकाचे वाटले.
या वेळी एका स्त्री शिबिरार्थीने माझ्या जवळ येऊन प्रांजळपणे सांगितले, ‘‘मी व्यवहारात माझे नातेवाईक आणि अन्य यांच्यासाठी पुष्कळ केले आहे. त्यामुळे ‘मी इतरांसाठी पुष्कळ केले’, असे मी सारखे म्हणत असते; परंतु ‘तुम्ही तर आमचे कुणीच लागत नसून आमच्यासाठी एवढे करत आहात’, हे पाहून आज माझीच मला लाज वाटत आहे. आता मी कधीच ‘मी पुष्कळ केले’, असे बोलणार नाही.’’
उ. ‘जीवन्मुक्त होण्यासाठी संगीताला साधनेची जोड देणे का आवश्यक आहे ?’, हा विषय ऐकल्यावर काही शिबिरार्थींनी विचारले, ‘‘आम्हाला आता पुढील साधना करायची आहे, तर आम्ही काय करू ? तुम्ही आम्हाला जोडून ठेवा.’’ आम्ही काही सांगायच्या आधीच ‘तुम्ही आमच्यासाठी ‘ऑनलाईन’ सत्संग चालू करू शकता’, अशी मागणी शिबिरार्थींकडून आली.
एकाने तर सांगितले, ‘‘आता एक वेळ संगीत सुटू शकेल; पण साधना नाही. साधनेचे महत्त्व माझ्या मनावर बिंबले आहे.’’
ऊ. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप १० मिनिटे ऐकवल्यावर ३ जणांची भावजागृती झाली. जप थांबवल्यानंतर १० मिनिटे झाली, तरी कोणालाही डोळे उघडावेसे वाटत नव्हते. त्यानंतरही शिबिरार्थींनी सांगितले, ‘‘शब्दांत काही व्यक्त करावे’, हे वाटत नाही. ‘केवळ स्थिर राहून हे अनुभवत रहावे’, असे वाटते.’’
ए. सगळे शिबिरार्थी शिबिरात सांगितलेली सूत्रे स्वतःहून लिहून घेत होते.
ऐ. काही शिबिरार्थींनी सांगितले, ‘‘शिबिरासाठी आगगाडीमधून येतांना ‘गोव्याला जात आहोत, तर तेथील समुद्रकिनार्यावर (बीचवर) जाऊया. काजू इत्यादी खरेदी करूया’, असे विचार आमच्या मनात येत होते; परंतु महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात आल्यावर इथलेे दोन दिवस कोणतेच बाह्य विचार आमच्या मनात आले नाहीत, तसेच ‘बाहेर जाऊन गोव्यात फिरूया’, असा विचारही आमच्या मनातून आपोआप निघून गेला.’’
ओ. शिबिराच्या आयोजिकांच्या ‘भारतीय परंपरेनुसार साडी नेसणे, मध्यभागी भांग पाडून अंबाडा घालणे’ इत्यादी सात्त्विक कृती पाहून एका शिबिरार्थीने त्याप्रमाणे लगेच कृती केल्याचे आणि त्यातून पुष्कळ आनंद मिळाल्याचे सर्वांसमोर येऊन सांगितले.
औ. शिबिरार्थींपैकी बर्याच जणांनी स्वेच्छेने कार्यासाठी अर्पण दिले. सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा वितरण कक्षही या वेळी लावण्यात आला होता. त्याचाही शिबिरार्थींनी उत्साहाने लाभ करून घेतला.
७. शिबिराच्या आधी आणि शिबिराच्या वेळी झालेले आध्यात्मिक त्रास
शिबिरामध्ये आरंभापासूनच पुष्कळ अडथळे असल्याचे सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितले होते. ‘सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या मार्गदर्शनानुसार आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने हे अडथळे न्यून होत गेले आणि शिबिराची परिणामकारकता वाढली’, असे आयोजकांनी अनुभवले.
अ. शिबिराला येण्याआधीच एक कलाकार त्यांच्या घरी पडले. चालता येत नसल्याने त्यांना येणे रहित करावे लागले.
आ. शिबिराच्या पहिल्या दिवशी आलेल्या एक शिबिरार्थी बसमध्ये चढतांना पडल्या आणि त्यांच्या बोटांचा अस्थिभंग झाला. त्यामुळे त्यांना दुसर्या दिवशीच परत जावे लागले.
इ. पहिल्या दिवशी शिबिरात जडपणा जाणवत होता. गायन आणि वादन यांचा प्रयोग झाल्यावर वातावरणातील अन् शिबिरार्थींवरील दाब न्यून होऊन शिबिरात सहजता जाणवायला लागली.
ई. सद़्गुरु गाडगीळकाका म्हणाले, ‘‘हे पहिलेच शिबिर आहे, ज्यामध्ये आरंभापासूनच मला माझा संपूर्ण चेहरा आणि छातीपर्यंत आवरण जाणवत होते, म्हणजे सूक्ष्मातील विरोध मोठ्या प्रमाणात होता. सतत उपाय करत गेल्यामुळे अडथळे न्यून होत गेले. ‘शिबिराची एवढी चांगली फलनिष्पत्ती मिळेल’, असे मला वाटले नव्हते; पण शिबिर पुष्कळच चांगले झाले.’’
(क्रमश:)
संकलक : सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१०.१०.२०२३)