भ्रमणभाषांचे उत्पादन करून त्यांची निर्यात करणारा चीननंतर जगातील दुसरा देश बनला भारत !

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पटीने केली निर्यात !

  • चीनकडून भारतात उत्पादित भ्रमणभाषांच्या विरोधात दुष्प्रचार !

नवी देहली – भ्रमणभाषांच्या उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये भारताने मोठी भरारी घेतली आहे. भारतात उत्पादन करण्यात येणार्‍या विविध आस्थापनांच्या भ्रमणभाषांची निर्यात जवळपास दुप्पटीने वाढली आहे. यामुळे चीननंतर भारत हा भ्रमणभाष निर्यात करण्यामध्ये जगातील दुसरा देश बनला आहे, अशी माहिती केंद्र सरकारचा वाणिज्य विभाग आणि ‘इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स एसोसिएशन’ ही संघटना यांनी दिली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत भारताने तब्बल ५.५ बिलियन डॉलरचे (४५.७७ सहस्र कोटी रुपयांचे) भ्रमणभाष निर्यात केले. हा आकडा गेल्या वर्षी याच कालावधीत साधारण ३ बिलियन डॉलर (साधारण २५ सहस्र कोटी रुपये) होता.

१. या गतीने भारत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तब्बल १ लाख २० सहस्र कोटी रुपयांचे भ्रमणभाष निर्यात करेल, असा अनुमानही वर्तवण्यात आला आहे.

२. ‘काउंटरपाँईंट’ या संघटनेनुसार आर्थिक वर्ष २०२३ मध्ये उत्पादित भ्रमणभाषांपैकी २२ टक्के भ्रमणभाषांची निर्यात करण्यात आली. यामुळे चीनची काळजी वाढली असून तो भारतीय बनावटीच्या भ्रमणभाषांमध्ये कथित खराबी असल्याचे सांगून भारतविरोधी षड्यंत्र आखत आहे. ‘भारतात बनवलेले स्मार्टफोन गरम होतात’, अशा प्रकारे चीन दुष्प्रचार करण्यात गुंतला आहे.

३. भारतात भ्रमणभाषांचे उत्पादन होत असल्याने सामान्य भारतीय नागरिकाला ते स्वस्त दरात उपलब्ध होऊ लागले आहेत. भ्रमणभाष आस्थापने मोठ्या प्रमाणात भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे.

संपादकीय भूमिका 

येनकेन प्रकारेण (कोणत्याही प्रकारे) भारताचे अहित चिंतणार्‍या कावेबाज चीनला शह देण्यासाठी भारतानेही पावले उचलावीत !