मणीपूर येथे आंदोलकांचे राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर आक्रमण !

इंफाळ (मणीपूर) – गेल्या काही कालावधीपासून शांत असलेले मणीपूर आता पुन्हा धगधगत आहे. २८ सप्टेंबरच्या सायंकाळी ५०० ते ६०० आंदोलकांनी राज्याचे मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांच्या इंफाळ पूर्वेतील हेनगांग येथील वडिलोपार्जित घरावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सुरक्षारक्षकांनी त्यांच्यावर गोळीबार करून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सुरक्षारक्षकांनी १०० मीटर अंतरावरच जमावाला रोखले. यानंतर परिसरातील वीज सेवा खंडित करण्यात आली होती. मुख्यमंत्री सिंह सध्या या घरात रहात नसून त्यांच्या शासकीय निवासस्थानी रहातात.

राज्यात हिंदु मैतेई समुदायाच्या २ तरुणांना ठार मारल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. हिजाम लिंथोइंगमी (वय १७) आणि फिजाम हेमजीत (वय २०) अशी मृत मुलांची नावे असून ते ६ जुलैपासून बेपत्ता होते. त्यांना आतंकवाद्यांनी मारले असून त्यांची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून समोर आली. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शहरात हिंसक निदर्शने केली. २८ सप्टेंबरच्या पहाटे इंफाळ पश्‍चिम जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली. तसेच २ चारचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या.

संपादकीय भूमिका 

राज्यातील हिंसाचार समाप्त करण्यासाठी मूलगामी उपाय न काढल्यानेच हिंसाचार पुन:पुन्हा डोके वर काढत आहे, हेच अशा घटनांतून म्हणता येईल !