प्रशासनाची गणेशोत्‍सवात भाविकांना विसर्जन करू न देण्‍याची बळजोरी का ?

समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने पत्रकार परिषदेत प्रश्‍न

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. अर्जुन आंबी, श्री. मनोहर सोरप, श्री. किरण दुसे, श्री. दीपक देसाई, श्री. उदय भोसले, श्री. संभाजीराव भोकरे, अधिवक्‍ता सुधीर-वंदूरकर जोशी, डॉ. मानसिंग शिंदे, श्री. शिवानंद स्‍वामी, श्री. मधुकर नाझरे

कोल्‍हापूर, १७ सप्‍टेंबर (वार्ता.) – वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात होत आहे. ते रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने काहीही कृती केली जात नाही; मात्र तेच वर्षातून एकदाच येणार्‍या गणेशोत्‍सवामध्‍ये श्री गणेशमूर्तींच्‍या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते, असे म्‍हणत प्रशासन आणि पर्यावरणवादी जागे होतात. गणेशोत्‍सव हा धार्मिक विषय असतांना प्रशासन हिंदूंचे धर्माचार्य, संत, अधिकारी यांच्‍याशी कोणतीही चर्चा न करता श्री गणेशमूर्ती विसर्जन होऊ देणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेते. त्‍यामुळे प्रशासनाची गणेशोत्‍सवात भाविकांना विसर्जन करू न देण्‍याची बळजोरी का ?, असा प्रश्‍न समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या पत्रकार परिषदेत उपस्‍थित करण्‍यात आला. ही पत्रकार परिषद १६ सप्‍टेंबरला ‘प्रेस क्‍लब’ येथे घेण्‍यात आली.

या प्रसंगी शिवसेना उपजिल्‍हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई, हिंदु महासभेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. राजू तोरस्‍कर, विश्‍व हिंदु परिषेदेचे जिल्‍हामंत्री अधिवक्‍ता सुधीर वंदूरकर-जोशी, श्री. विजय पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेनेचे श्री. अर्जुन आंबी, युवासेनेचे श्री. रोहन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्‍वामी, सनातन संस्‍थेचे डॉ. मानसिंग शिंदे उपस्‍थित होते.

श्री. दीपक देसाई म्‍हणाले, ‘‘या संदर्भात करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्‍वामी यांनी एक पत्र दिले आहे. त्‍यात अशासकीय किंवा शासकीय संस्‍थांना श्री गणेशमूर्ती दान घेण्‍याचा हक्‍क पोचत नाही; कारण ते ‘सेक्‍युलर’ राष्‍ट्राचे प्रतिनिधित्‍व करतात. कृत्रिम तलाव केवळ श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी करणे आणि जनतेचा पैसा वाया घालवणे योग्‍य नाही. त्‍यापेक्षा आहे त्‍या तलावात एका विशिष्‍ट जागी श्री गणेशमूर्ती पारंपरिक पद्धतीने विसर्जित कराव्‍यात, असे त्‍यात नमूद केले आहे.’’

या प्रसंगी श्री. संभाजीराव भोकरे, अधिवक्‍ता सुधीर वंदूरकर-जोशी, श्री. उदय भोसले आणि श्री. किरण दुसे, डॉ. मानसिंग शिंदे यांनीही त्‍यांचे मत व्‍यक्‍त केले.