पसार असतांना सुलेमान याने काढलेल्या चित्रफितींविषयी पोलिसांकडून अन्वेषण चालू
पणजी, २४ डिसेंबर (वार्ता.) – भूमी घोटाळा प्रकरणातील संशयित सिद्दीकी उपाख्य सुलेमान गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीत असतांना पसार झाला. यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली. या प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी त्याला न्यायालयात उपस्थित केल्यावर त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुलेमान याने त्याला पोलीस कोठडीतून पळून जाण्यास साहाय्य करणार्या आणि सध्या बडतर्फ करण्यात आलेला हवालदार अमित नाईक याला कोणते आमीष दाखवले होते आणि तो पसार असतांना त्याने काढलेल्या २ चित्रफितींतील सत्यता यांविषयी जुने गोवे पोलिसांनी चौकशी चालू केली आहे.
१. बडतर्फ हवालदार अमित नाईक याने सुलेमान याने ‘कोठडीतून पळून जाण्यास साहाय्य केल्यास ३ कोटी रुपये देऊ’, असे सांगितल्याचे पोलीस चौकशीत सांगितले होते.
२. सुलेमान खान याने बनवलेल्या दुसर्या चित्रफितींमध्ये अमित नाईक याला रक्कम देण्याचे आमीष दिल्याचे म्हटले आहे; मात्र हुबळ्ळी येथे पोचल्यावर ‘त्याला पैसे न देता फसवणूक केली’, असेही म्हटले आहे.
३. सुलेमान याने पहिल्या चित्रफितीमध्ये एक आमदार आणि पोलीस यांच्यावर केलेले आरोप आप पक्षाचे गोव्यातील निमंत्रक अधिवक्ता अमित पालेकर यांच्या सांगण्यावरून केल्याचे म्हटले आहे. तर दुसर्या चित्रफितीमध्ये गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीत असतांना पोलीस अमित नाईक यांच्याशी मैत्री केली, असे म्हटले आहे. सुलेमान याने दोन्ही चित्रफितींमध्ये परस्परविरोधी विधाने केली असल्याने त्याने स्वतःहून या चित्रफिती बनवल्या कि त्याच्यामागे आणखी कुणी आहे ?, याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत.
सुलेमानची पत्नी अफसाना हिचीही चौकशी होणार
भूमी घोटाळा प्रकरणी म्हापसा येथील गुन्ह्यामध्ये सुलेमान याची पत्नी अफसाना उपाख्य सारिका हिला म्हापसा न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. विशेष अन्वेषण पथकाकडून तिची चौकशी चालू आहे. भूमी घोटाळा प्रकरणात तिने सुलेमान खान याला बनावट कागदपत्रे बनवण्यास साहाय्य करून भूमी घोटाळा प्रकरणात साहाय्य केले आहे. तिने सुलेमान याला पलायन केल्यानंतर लपण्यास साहाय्य केल्याचा आरोपही तिच्यावर आहे. विशेष अन्वेषण पथकाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिला चौकशीसाठी जुने गोवे पोलीस कह्यात घेणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
गोव्यातील कुख्यात गुंड सुलेमान याला पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करायचे होते ! – अलोक कुमार, पोलीस महासंचालक
पणजी, २४ डिसेंबर (वार्ता.) – गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोठडीतून पळालेला कुख्यात गुंड आणि भूमी बळकावल्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुलेमान सिद्दीकी पसार असतांना तो निरनिराळे व्हिडिओ प्रसारित करून पोलीसदलाचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांची अन्वेषणाची दिशा भरकटवण्याचा त्याचा प्रयत्न होता; मात्र पोलीसदलाने आपल्या भावनांना आवर घालून सुलेमान याला पुन्हा कह्यात घेण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. पोलीस सुलेमान याच्या मागावर होते आणि त्याला अखेर २३ डिसेंबर या दिवशी कह्यात घेतले. ‘गोव्यात सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. सायबर गुन्ह्यांद्वारे झालेल्या पैशांच्या फसवणुकीतील रक्कम मिळवण्याचे प्रमाण पूर्वी ७ – ८ टक्के होते, ते आता ३० टक्के झाले आहे, अशी माहिती गोव्याचे पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिली.