सातारा, २४ डिसेंबर (वार्ता.) – सातारा जिल्ह्याला ४ कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे उत्तरदायित्व वाढले आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जनकल्याणाचे कार्य व्हावे, अशी अपेक्षा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली, तसेच नवनियुक्त मंत्र्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री पदाचा कार्यभार घोषित झाल्यानंतर सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये येऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. तेव्हा ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. या वेळी खासदार भोसले यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सातारा कंदी पेढा भरवत विशेष सत्कार केला.
खासदार भोसले प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना म्हणाले, ‘‘यापूर्वीही जिल्ह्यातील अनेकांना संधी मिळाली; पण त्यांनी काहीही केले नाही. यशवंतराव चव्हाण यांचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याची अशी स्थिती का झाली ? काँग्रेस पक्षाने केवळ घोषणा करण्यापलीकडे काहीच केले नाही. भाजपच्या माध्यमातून राज्यातील अधिकाधिक जनतेचे कल्याण होईल. निश्चितच शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याचेही कल्याण होईल.’’