ए.पी.एम्.सी. येथील अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई करण्यासाठी नागरिकांचे निषेध आंदोलन !

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासन यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही ए.पी.एम्.सी. (कृषी उत्पन्न बाजार समिती) येथील अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई होत नसल्याने येथील संतप्त रहिवाशांनी प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन केले. सिडकोच्या माध्यमातून विकासकांना भूखंड वाटप करण्यात आले आहेत. त्यांवर राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि भूमाफिया यांनी मिळून झोपडपट्टी वसवली आहे. मागील ५ वर्षांपासून हा प्रकार चालू आहे. या ठिकाणी अमली पदार्थ विक्री करणे, वेश्याव्यवसाय करणे, बेकायदेशीर पार्किंग करणे, तसेच गर्दुल्यांकडून होणारी लूटमार आदी प्रकार होत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करून वारंवार गुन्हेही नोंदवले; पण आर्थिक हितसंबंधांमुळे सिडको आणि महापालिका तुर्भे विभाग कार्यालय यांच्याकडून कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप येथील रहिवाशांनी केला. महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

या प्रकरणी तुर्भे विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी प्रबोधन मावाडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या ठिकाणच्या झोपडपट्टीवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.

संपादकीय भूमिका

नागरिकांनी रस्त्यावर उतरावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !