फातर्पा (गोवा) येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थान समितीने न्यायदंडाधिकार्‍यांसमोर दिली माहिती

समितीने जत्रोत्सवात मुसलमान विक्रेत्यांवर बंदी घालण्याचा ठराव केला नाही, तर ते महाजनांचे वैयक्तिक मत !

मडगाव, २४ डिसेंबर (वार्ता.) – फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थान समितीने जत्रोत्सवात मुसलमान विक्रेत्यांवर बंदी घालण्यासंबंधी कोणताही ठराव केला नाही, तर ते महाजनांचे वैयक्तिक मत होते. श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थान समितीने केपे तालुक्याचे न्यायादंडाधिकारी मनोहर कारेकर यांच्यासमोर ही माहिती दिली.

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानाच्या जत्रोत्सवात मुसलमान विक्रेत्यांना बंदी घातल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानचे पदाधिकारी मंगेश देसाई, संतोष देसाई आणि आनंद देसाई यांच्यासह कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुदन भोसले यांची उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभी उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर म्हणाले,‘‘फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानाच्या जत्रोत्सवात विशिष्ट समुदायाला दुकाने लावण्यास बंदी घालणे कायदेशीर नाही. हे त्यांच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन आहे. भारतीय राजघटनेत धर्म, वंश, जात, लिंग या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे.’’ केपेचे मामलेदार नाथन अफान्सो म्हणाले,‘‘कथित निर्बंधामुळे समाजातील आणि सामान्य लोकांमध्ये समावेशकता, निष्पक्षता आणि संभाव्य बहिष्कार यांविषयी चिंतेचे वातावरण आहे. या बैठकीत श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानाच्या पदाधिकार्‍यांनी बैठकीत पुढील सूत्रे मांडली.

१. जत्रोत्सवात मुसलमान विक्रेत्यांवर बंदी घातल्यासंबंधी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या या बैठकीतील महाजनांच्या वैयक्तिक विधानांवर आधारित आहेत आणि ती देवस्थान समितीची अधिकृत भूमिका नाही.

२. देवीचा वार्षिक जत्रोत्सव हा अनेक दशकांपासून धार्मिक सलोख्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो आणि यामध्ये विविध जाती अन् धर्म यांचे लोक मोठ्या उत्साहाने देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र येतात.

३. मंदिर प्रशासनाचा उद्देश हा कार्यक्रमाचे धार्मिक पावित्र्य आणि सुरक्षितता जपण्याचा आहे, कोणताही समुदाय किंवा विक्रेता यांच्याशी भेदभाव करण्याचा हेतू नाही. सुसंवाद, भक्ती आणि सर्वसमावेशकता हा उत्सवाचा केंद्रबिंदू आहे.