पुणे येथील ग्रंथ प्रकाशन सोहळा !
पुणे, २९ ऑगस्ट (वार्ता.) – सरळ सोप्या शब्दांमध्ये, जगमान्य होईल, असे ‘शककर्ते शिवराय’ हा ग्रंथ लिहिण्याचे कार्य घडले. या ग्रंथाने २ क्रांतीकारी निर्णय झाले. लोकमान्य टिळकांपासून शिव जन्मदिनाचा वाद संपुष्टात आला. फाल्गुन वद्य तृतीया, शालिवाहन शके १५५१, १८ फेब्रुवारी १६३० हा जन्मदिनांक शासनमान्य झाला, तर पौष शुक्ल पौर्णिमा, शालिवाहन शके १५१९, १२ जानेवारी १५९८ हा राजमाता जिजाऊंचा जन्मदिनांक मानला गेला. शिवचरित्र लिहिण्याची आज्ञा छत्रपतींनी दिली, त्याला सद़्गुरु प.पू. विष्णुदास महाराज यांचे आशीर्वाद लाभले, तर श्री गणेशाची कृपा लाभली, अशी कृतज्ञता ‘शिवकथाकार’ सद़्गुरुदास श्री. विजयराव देशमुख यांनी व्यक्त केली. ते ‘छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर’ आणि ‘एम्.आय.टी. विश्वशांती युनिव्हर्सिटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘ग्रंथ प्रकाशन सोहळ्या’त बोलत होते.
या वेळी शिवकथाकार श्री. विजयराव देशमुख लिखित ‘शककर्ते शिवराय’ ग्रंथाची ५ वी आवृत्ती, ‘राजा शंभू छत्रपती’ ग्रंथाची ५ वी आवृत्ती आणि ‘सूर्यपुत्र’ या ग्रंथाची ३ री आवृत्ती या ग्रंथांचे प्रकाशन कोथरूड येथे झाले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘एम्.आय.टी. विश्वशांती विद्यापीठा’चे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, मेजर शिशिर महाजन, खासदार श्रीनिवास पाटील, पं. वसंतराव गाडगीळ उपस्थित होते. या वेळी छत्रपतींची ललकारी देत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषामध्ये या ३ ग्रंथांची पालखीतून दिंडी काढण्यात आली.
‘शिवकथाकार’ देशमुख म्हणाले की, या ग्रंथांची निर्मिती ही १९७४ मध्ये झालेल्या आघातांनी झाली. त्या वेळच्या विद्वान लेखकांनी ‘रॉयल्टी’वरून (पुस्तक लिहिण्याचे मानधन) ग्रंथ लिहिण्याचे नाकारले, तर राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला चित्रपट अभिनेत्री बोलवावी लागली. १९७४ ते १९८२ या ८ वर्षांच्या कालखंडामध्ये अनेक ठिकाणी भेटी देणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, गड-दुर्ग सर करणे यांतून हा ग्रंथ साकार झाला. वर्ष १९७४ मध्ये ‘ठेव योजने’तून ६० सहस्र रुपये केवळ एका मासामध्ये जमा होणे ही शिवकृपाच आहे. गेली ६१ वर्षे शिवकथा सांगण्याचे कार्य करत आहे. आज खर्या अर्थाने माझी ‘एकसष्ठी’ साजरी होत आहे. शिवकृपेने कोणतेही मानधन न घेता आजपर्यंत व्याख्याने घेत आलो आहोत.
विशेष
‘छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर’च्या वतीने अखंड ४२ वर्षे ‘इतिहास, धर्म आणि संस्कृती’ क्षेत्रांत कार्य करणार्यांना ‘जिजामाता विद्वत गौरव’ पुरस्कार देण्यात येतो. शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्त ‘हर घर शिवचरित्र’ या मोहिमेद्वारे १ लाख घरी शिवचरित्र देण्याचा संकल्प आहे.