मुंबई – संयुक्त राष्ट्रांची महिला परिषद आणि राज्याचा महिला आणि बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या विकासासाठी राज्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याविषयी १७ ऑगस्ट या दिवशी महिला आणि बाल विकासमंत्री कु. अदिती तटकरे आणि संयुक्त राष्ट्राच्या महिला परिषदेच्या प्रतिनिधी यांच्यासमवेत सामंजस्य करार झाला. कु. अदिती तटकरे यांनी याविषयी लवकरच कृती आराखडा सिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले.
महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत सामंजस्य करार करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे – https://t.co/ebf4wJ36jU
— News Today 24×7 (@NewsToday_24x7) August 17, 2023
या वेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, भारताच्या संयुक्त राष्ट्रातील महिला परिषदेच्या समन्वयक सुशान जान फर्ग्युसन उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देतांना कु. अदिती तटकरे म्हणाल्या, ‘‘महिलांसाठी राबवण्यात येणार्या योजनांची माहिती प्रत्येक महिला वर्गाला व्हावी, महिलांवरील हिंसाचाराला प्रतिबंधासाठी गावपातळीवर हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी नव्याने गावपातळीवर महिला समित्या नेमणे, महिलांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणे, महिलांसाठी पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती करणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिलांसाठी विकासाभिमुख योजना राबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत लवकरच राज्य कृती आराखडा सिद्ध करेल. राज्यात तो प्रभावीपणे राबवण्यात येईल.’’