मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – यापूर्वी साकवांची दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या द्वारे करण्यात येत होती; मात्र यापुढे साकवांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र शीर्ष सिद्ध करण्यात येईल. त्यासाठी १ सहस्र ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली. आमदार रईस शेख यांनी महाबळेश्वर येथील दुर्गम गावाला जोडणार्या साकवाच्या दुरुस्तीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्र्यांनी वरील माहिती दिली.
या वेळी भाजपचे आमदार योगेश सागर या वेळी म्हणाले की, याविषयी शासन आदेश काढण्यात यावा. शासन आदेश न काढल्यास ‘काम कुणी करावे ?’ याविषयी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात वाद निर्माण होईल. त्यामुळे याविषयी शासन आदेश काढण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. त्यावर रवींद्र चव्हाण यांनी शासन आदेश काढण्याचे आश्वासन दिले.