मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे ३२१ भूखंड आहेत. त्यांतील २५५ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे; मात्र त्यांतील केवळ २७ भूखंडांवर उद्योग चालू आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली. यातून वाशिम येथील ३२१ पैकी २९४ भूखंडांवर उत्पादन होत नाही. हे भूखंड पडून आहेत, हा गंभीर प्रकार विधानसभेत उघड झाला. आमदार अमित झनक यांनी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी वाशिम जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाकडे असलेल्या भूखंडांची वरील स्थिती सभागृहात सांगितली.