कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापिठातील विद्यार्थ्यांना जुने पेपर दिल्याच्या प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री  

विधान परिषद लक्षवेधी सूचना

चंद्रकांत पाटील

मुंबई, २७ जुलै (वार्ता.) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत चालू व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या परीक्षेत सलग सातव्या पेपरला विद्यार्थ्यांना जुनीच प्रश्नपत्रिका देण्यात आल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली जाईल. येत्या आठवड्यात या समितीच्या अहवालावर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २६ जुलै या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिले. सदस्य सत्यजीत तांबे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती.


कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापिठासह राज्यातील इतर विद्यापिठांतील अनागोंदी कारभाराचे पडसाद विधान परिषदेत उमटले. अनेक विद्यापिठांत जुनीच प्रश्नपत्रिका देणे, पेपर चालू होण्यापूर्वीच सामाजिक माध्यमांतून पेपर फुटणे असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे संबंधित विद्यापिठांतील कुलगुरु आणि परीक्षा नियंत्रक यांची चौकशी करून त्यांच्याकडून त्यागपत्र घ्यावे. ही चूक विद्यापिठाच्या वतीने झाली असल्याने पुनर्परीक्षेचे परिपत्रक रहित करून व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्यात यावे, अशी विद्यार्थी संघटनांनी केलेली मागणी, तसेच विद्यापीठ प्रशासनाच्या या गंभीर चुकीची शासनाकडून सखोल चौकशी करावी, असे विविध प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना धारेवर धरले.

यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील ज्या ज्या विद्यापिठांमध्ये असे प्रकार घडले असतील, तेथे उच्च शिक्षणाचे संचालक जाऊन कुलगुरु, परीक्षा नियंत्रक आणि संबंधित विभागातील अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यांच्या कार्यपद्धती कोणत्या आहेत ? परीक्षांचे नियोजन करण्याविषयी ते कोणत्या पद्धती वापरतात, अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून चुकीच्या कार्यपद्धतींत सुधारणा करण्यात येतील, तसेच पेपरच्या वेळी जुने पेपर न देता त्या त्या विषयाचे त्या वर्षीचे पेपर देण्याविषयी कडक सूचना केल्या जातील.