गोवा : करंझोळला रेल्वेमार्गावर दरड कोसळली 

दक्षिण-पश्चिम रेल्वेसेवा बंद : काही रेल्वेगाड्या रहित, तर काही वळवल्या

दरड कोसळल्यामुळे बोगदा बंद आहे, तसेच माती हटवण्याचे काम चालू आहे

मडगाव, २६ जुलै (वार्ता.) – संततधार पडणारा पाऊस आणि त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने, तसेच जमीन फुगल्याने, दूधसागर ते कॅसलरॉक यामधील करंझोळ रेल्वेस्थानकाच्या ब्रागांझा घाटात दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली. (गोवा मुक्तीच्या ६० वर्षांनंतरही घाटाला अद्याप पोर्तुगिजाचेच नाव का ? ही वैचारिक गुलामी कधी संपणार ? – संपादक)

त्यामुळे या मार्गावरील रेल्वेसेवा कोलमडली. काही रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या, तर काही रेल्वेगाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. रेल्वे क्रमांक १७३०९ ही यशवंतपूर ते वास्को-द-गामा आणि रेल्वे क्रमांक १७३१० ही वास्को-द-गामा ते यशवंतपूर या रेल्वेगाड्या २६ जुलैला रहित करण्यात आल्या. रेल्वे क्रमांक १२७७९ ही वास्को-द-गामा ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ही वास्को-द-गामा येथून धावणारी गाडी मडगाव, माजोर्डा, मदुरे, रोहा, पनवेलवरून कर्जत, लोणावळा आणि पुणे स्थानक या मार्गाने वळवण्यात आली. त्यामुळे सावर्डे-कुडचडे, कुळे, कॅसलरॉक, लोंढा, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सांगली, कराड, सातारा स्थानकांवरील थांबे या रेल्वेगाडीला घेता आले नसल्याची माहिती दक्षिण-पश्चिम रेल्वेचे हुबळी विभागाचे ज्येष्ठ संपर्क अधिकारी अनिश हेगडे यांनी दिली.

रेल्वेमार्गावर पडलेली दरड हटवून रेल्वेमार्ग आणि सेवा पूर्ववत् करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.