विधान परिषद कामकाज
मुंबई – यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम यांसह राज्यात अनेक ठिकाणी अतीवृष्टी झाली आहे. त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री याचा आढावा घेत असून या सर्व परिस्थितीवर शासनाचे बारीक लक्ष आहे. गतवर्षी अतीवृष्टीसाठी घोषित करण्यात आलेल्या १ सहस्र ५०० कोटी रुपयांच्या अनुदानापैकी ६०० कोटी रुपयांचे साहाय्य वितरित करण्यात आले असून उर्वरित निधी लवकरात लवकर वितरित केला जाईल. अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना १० सहस्र रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी विधान परिषदेत राज्यात निर्माण झालेल्या पावसाच्या परिस्थितीवर भाष्य केले.
१. अतीवृष्टी झालेल्या गावांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर, तसेच विहिरी अधिगृह करून स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येईल. दुकानांची हानी झाल्यास ५० सहस्र रुपये आणि टपरीसाठी १० सहस्र रुपयांचे अनुदान देण्यात येईल. पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून आजच धान्य पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
२. पुरामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होईल त्यांना शिक्षणविभाग साहित्य उपलब्ध करून देईल, तसेच भंडारा येथे वीज पडलेल्या लोकांना उद्यापर्यंत साहाय्य केले जाईल.
३. या परिस्थितीकडे शासनाचे लक्ष असून ज्यांना दुबार पेरणी आवश्यक आहे अशा शेतकर्यांना पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिले जाईल.
४. ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे मृत्यू झाले आहेत त्या ठिकाणी मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये; म्हणून स्वच्छता करण्यात येणार आहे.
५. दुसरीकडे राज्यात पंढरपूर, सोलापूर, सांगली, सातारा येथे पाऊस अल्प झाल्याने टँकरची आवश्यकता आहे, तिथे टँकर दिले जातील.
६. अतीवृष्टी आणि दुष्काळ अशा दोन्ही गोष्टींवर शासनाचे लक्ष असून कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, अशी चेतावणीही या प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी दिली.