मुंबई, २४ जुलै (वार्ता.) – जे.जे. रुग्णालयातील नेत्ररोगतज्ञ समन्वयक डॉ. तात्याराव लहाने यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र राजकारणामुळे दिल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत फेटाळून लावला. डॉ. लहाने यांनी तडकाफडकी दिलेल्या त्यागपत्राविषयी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी २४ जुलै या दिवशी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
याविषयी माहिती देतांना हसन मुश्रीफ यांनी डॉ. लहाने जे.जे. रुग्णालयातून ३० जून २०११ या दिवशी निवृत्त झाले. ११ ऑगस्ट या दिवशी शासनाच्या ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. लहाने यांची नियुक्ती करण्यात आली. निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेच्या नेत्र विभागातील निवासी डॉक्टरांनी ‘डॉ. लहाने हे शस्त्रक्रिया करण्यासाठी देत नाहीत’, अशी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर ३ मासांचा कार्यकाळ शिल्लक असूनही डॉ. लहाने यांनी पदाचे त्यागपत्र दिले. यामध्ये कोणतही राजकारण झालेले नाही, असे सांगितले.
या वेळी भाजपचे आमदार योगेश सागर म्हणाले की, डॉ. लहाने यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींना सरकारने गंभीरपणे घेतले आहे. या सर्व प्रकरणाची निष्पक्षपाती अन्वेषण करण्याची मागणी केली; मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ. लहाने यांनी स्वत:हून त्यागपत्र दिल्याची पुनररावृत्ती केली.