|
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेले ४ दिवस पावसाची संततधार चालूच आहे, तसेच वादळी वारेही वहात आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सतत पडणार्या पावसामुळे घरे, गोठे यांच्यासह खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेची हानीही होत आहे. सततच्या पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे डोंगर खचण्याची शक्यता गृहित धरून जिल्ह्यात डोंगराच्या पायथ्याशी, तसेच डोंगरापासून जवळ असलेली गावे आणि वस्त्या यांना प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.
१. वैभववाडी – गगनबावडा तालुक्यात मांडूकली नजीक महामार्गावर पाणी आल्याने सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या राधानगरी मार्गे वळवण्यात आल्या आहेत. मार्ग बंद झाल्याने गगनबावडा आणि वैभववाडी तालुक्यात अवजड वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
लोरे क्रमांक २ येथे गोसावी हॉटेल नजीक मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडल्याने वैभववाडी – फोंडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
२. वेंगुर्ला – तालुक्यातील तुळस पलतड येथील धोकादायक दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली असली, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या दरडीच्या बाजूला असलेल्या ४ घरांतील ११ ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी रहाण्यासह काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येथील ग्रामस्थ रात्रीच्या वेळी नातेवाइकांकडे झोपण्यासाठी जात आहेत.
• म्हापण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोरील दरड कोसळली असून तेथील धोकादायक २ घरांतील ६ जणांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे, अशी माहिती वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.
• उभादांडा ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सरपंच नीलेश चमणकर यांच्या संकल्पनेतून पावसाळ्यात उद्भवणार्या आपत्कालीन परिस्थितीत साहाय्य करण्यासाठी ९ जणांचे आपत्कालीन पथक सिद्ध करण्यात आले आहे.
• वेंगुर्ला-सावंतवाडी मार्गावरील तुळस घाटी येथे दरड कोसळून भला मोठा दगड रस्त्याच्या बाजूला येऊन धोकादायक स्थितीत अडकला आहे. अपघात होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याची नोंद घेऊन तो हटवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
३. कुडाळ – येथे पूरस्थिती २३ जुलै या दिवशीही कायम होती. २२ जुलै या दिवशी येथील भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने पंचायत समितीकडील रस्ता १० घंटे बंद होता. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील पूरस्थिती कायम आहे. कुडाळसह कविलकाटे, पावशी, वेताळबांबर्डे, पिंगुळी, मांडकुली, बांबुळी, बांव, सरंबळ, चेंदवण यांसह नदीकिनारील भागात शेकडो हेक्टर भातशेती गेले ४ दिवस पाण्याखाली असून शेतीची हानी होत आहे. २३ जुलैपर्यंत तालुक्यात १ लाख ३७ सहस्र रुपयांची विविध स्वरूपाची हानी झाली आहे.
४. दोडामार्ग – पावसामुळे तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग (पाणी सोडणे) करण्यात येत आहे. परिणामी तिलारी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे भेडशी खालचा बाजार येथील रस्ता २३ जुलै या दिवशी ४ घंटे बंद होता. कुडासे-वानोशी येथे २२ जुलैच्या रात्री घराची भिंत कोसळून ठकी बमू वरक ही वयोवृद्ध महिला घायाळ झाली, तर तिची सून आणि २ नातवंडे प्रसंगावधान राखून बाजूला गेल्याने थोडक्यात वाचली.
• तिलारी नदीपात्राने पाण्याची धोक्याची पातळी ओलांडल्याने घोटगे-परमे पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक ठप्प झाली आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली तिलारी धरणाची पहाणीमुसळधार पाऊस आणि तिलारी धरणातून वाढत असलेला पाण्याचा विसर्ग (अतिरिक्त पाणी सोडणे) या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा येथील आमदार दीपक केसरकर यांनी तिलारी धरण आणि परिसराची पहाणी केली. या वेळी त्यांनी संबंधित अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. |