बोगस प्रकरणांमध्ये सोलापूर जिल्हा आघाडीवर !
मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – राज्यातील फळपीक योजनेत कोट्यवधी रुपयांचा अपप्रकार झाल्याविषयी मा. कृषी आयुक्त यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सोलापूर जिल्ह्यात एकूण ४ सहस्र ४१३ विमा अर्जदारांपैकी २ सहस्र ७१३ बोगस विमा प्रकरणे, तर जळगाव जिल्ह्यात एकूण ७८ सहस्र ४३० विमा अर्जदारांपैकी १९ सहस्र ९७२ अर्जांची पडताळणी झाली असून १ सहस्र १४५ बोगस विमा प्रकरणे आढळून आली आहेत. २६ जून २०२३ अखेर राज्यात एकूण २ लाख ४८ सहस्र ९३० विमा अर्जांपैकी १ लाख ९० सहस्र ४७२ विमा अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यांपैकी १४ सहस्र ७९८ बोगस प्रकरणे आढळून आली आहेत. बोगस विमा प्रकरणात संबंधित दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे दायित्व संबंधित विमा आस्थापनाचे असेल. त्यानुसार या प्रकरणी पडताळणी पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील संबंधित जिल्हाधिकार्यांना शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालय स्तरावरून देण्यात आले आहेत, अशी माहिती फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी २० जुलै या दिवशी विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या वेळी दिली. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्री. अमोल मिटकरी, श्री. शशिकांत शिंदे, श्री. विक्रम काळे, श्री. सतीश चव्हाण, श्री. अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.
प्रश्नोत्तराच्या वेळी उघड झालेली माहिती !
बोगस प्रकरणांची स्थानिक घटकांना चौकशी करण्यास विरोध केल्यामुळे ८० सहस्र प्रकरणांची चौकशी करण्यात आली नाही, तसेच शेतकर्यांना फसवून खोट्या माहितीच्या आधारे त्यांचा परस्पर विमा उतरवण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये ४० कोटी बोगस विमा प्रकरणे आहेत. क्षेत्रिय तपासणी अंती १४ सहस्र ७९८ बोगस विमा प्रकरणे आढळून आली असून त्यामधील केंद्र आणि राज्य हिस्सा अनुदानाची रक्कम ५३.२७ कोटी रुपये होते.