मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – ‘रोजगार हमी योजने’च्या अंतर्गत करण्यात आलेल्या विहिरीच्या कुशल आणि अकुशल कामगारांचे वेतन राज्यात मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. यामध्ये निधीवाटपामध्ये भेदभाव केला जात आहे. विरोधकांच्या मतदारसंघात निधी दिला जात नाही. केवळ सत्ताधारी पक्षाच्या मतदारसंघातच पैशाचे वाटप केले जात आहे, असा आरोप काँग्रेसच्या आमदार श्रीमती यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत केला. अधिवक्ता आकाश फुंडकर यांनी याविषयीचा तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता.
महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२३ ।
आ. यशोमती ठाकूर @AdvYashomatiINC pic.twitter.com/mw9suIkgfM— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 19, 2023
यावर उत्तर देतांना रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी निधीच्या वाटपात भेदभाव होत नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी राज्यातील कुशल कामगारांना वेतन देण्यात आलेले नाही, याविषयी माहिती देण्याची विनंती केली; मात्र मंत्रीमहोदयांना प्रलंबित वेतनाची माहिती देता आली नाही. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘१५ ऑगस्टपर्यंत विहिरींच्या कुशल आणि अकुशल कामगारांचे वेतन देण्यात येईल’, असे आश्वासन सभागृहात दिले.