मुंबईतील ६६३ रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’च नाही !

सरकार ९० दिवसांत घेणार आढावा !

मुंबई, १८ जुलै (वार्ता.) – राज्यातील रुग्णालयांमध्ये आग लागून रुग्णांच्या मृत्यूच्या घटना घडल्यानंतर २ वर्षांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ (‘फायर ऑडिट’ म्हणजे अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण) करण्याचा आदेश देण्यात आला आहे; मात्र अद्यापही राज्यातील अनेक रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करण्यात आलेले नाही. १८ जुलै याविषयी आमदार सुनील राऊत यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी मंत्री उदय सामंत यांनी मुंबईमध्ये खासगी आणि शासकीय रुग्णालये मिळून १ सहस्र ५७४ रुग्णालये आहेत. यांतील ६६४ रुग्णालयांना ‘फायर ऑडिट’ची व्यवस्था नसल्यामुळे नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती विधानसभेत दिली.

याविषयी उत्तर देतांना मंत्री उदय सामंत यांनी येत्या ९० दिवसांत मुंबईतील सर्व रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ केले जाईल. यासाठी स्वतंत्र यंत्रणा सिद्ध केली जाईल. याचा आढावा घेण्यात येईल, असे सांगितले. या वेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यामध्येही अनेक रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ झाले नसल्याचे सांगितले. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही अनेक खासगी रुग्णालयांमध्ये ‘फायर ऑडिट’ झाले नसल्याची माहिती सभागृहात दिली.

उदय सामंत म्हणाले, ‘‘राज्यातील सर्वच रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ ९० दिवसांत करण्यात येईल.’’ मागील काही वर्षांत राज्यात वसई, भंडारा, अमरावती आदी जिल्ह्यांत रुग्णालयांत आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.