कुडाळ – तालुक्यातील झाराप शाळा क्रमांक १ येथे कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षकांचे पालकांना विश्वासात न घेता अचानक स्थानांतर (बदली) करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी, ‘जोपर्यंत पदवीधर शिक्षकांची नियुक्ती शाळेत केली जात नाही, तोपर्यंत एकाही मुलाला शाळेत पाठवणार नाही’, अशी भूमिका घेत पालकांनी ११ जुलैपासून ‘शाळा बंद’ आंदोलन चालू केले आहे.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा झाराप क्रमांक १ या शाळेत एकूण ६४ पटसंख्या आहे. याठिकाणी २ पदवीधर आणि २ उपशिक्षक अशा शिक्षकांच्या ४ पदांना मान्यता आहे. यापैकी एक पदवीधर शिक्षकाचे पद यापूर्वीच रिक्त आहे, तर दुसर्या पदवीधर शिक्षकाचे नुकतेच अन्यत्र स्थानांतर करण्यात आले. शिक्षक नसल्याने शाळेची पटसंख्या घटत चालली आहे. त्यामुळे पदवीधर शिक्षक मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.
शाळा बंद झाल्याने कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदेश किंजवडेकर आणि प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांनी झाराप येथील श्री भावई मंदिर येथे पालकांची भेट घेतली. या वेळी किंजवडेकर यांनी एका मासात पदवीधर शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल, तसेच तात्पुरती उपाययोजना म्हणून एका पर्यायी शिक्षकाची नियुक्ती २ दिवसांत करू, असे लेखी आश्वासन पालकांना दिले; मात्र शिक्षक मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याच्या भूमिकेवर पालक ठाम राहिले.
संपादकीय भूमिकापालकांना असा निर्णय घ्यावा लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ? |