डी.एड्. बेरोजगार संघटनेची चेतावणी
दोडामार्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याविषयी शासनाने अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश तात्काळ रहित करण्यात यावा, अन्यथा डी.एड्. बेरोजगार सावंतवाडी शहरातील मोती तलावात जलसमाधी घेतील, अशी चेतावणी डी.एड्. बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय फाले यांनी दिली आहे.
नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा स्थानांतरामुळे जिल्ह्यात एकही शिक्षक नसल्याने अनेक शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची हानी होत आहे. त्यातच गेली अनेक वर्षे शासनाने शिक्षक भरती केलेली नाही. त्यामुळे शिक्षणशास्त्र (डी.एड्.) पदविका घेतलेले शेकडो जण बेरोजगार आहेत. शिक्षक भरती प्रक्रिया राज्यस्तरावर राबवल्याने परजिल्ह्यांतील शिक्षकांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियुक्ती होते. परिणामी स्थानिक उमेदवार यापासून वंचित रहातात. तसेच परजिल्ह्यांतून आलेले शिक्षक कालांतराने आपापल्या जिल्ह्यात स्थानांतर करून घेतात. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांची पदे रिक्त रहाण्याची समस्या कायमच रहाते. यावर्षी शिक्षकांची समस्या सोडवण्यासाठी शासनाने निवृत्त शिक्षकांना घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक बेरोजगार डी.एड्. उमेदवारांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या बेरोजगारांना शिक्षण सेवेत सामावून घ्यावे, तसेच शिक्षकभरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
संपादकीय भूमिकाशासनाला हे का कळत नाही ? |