‘समाज, साधक आणि शिष्य कधी श्री गुरूंना ओळखू शकत नाहीत. जे अवतार श्री गुरुरूपात कार्य करत असतात, त्यांना ओळखणे अशक्य कोटीतील असते. त्यामुळे अशा वेळी तेच स्वतःच्या अवतारत्वाची शिष्यांना अनुभूती, तर साधक आणि समाज यांना ओळख करून देतात. इतकेच नव्हे, तर श्रीविष्णूच्या अवतारी कार्याची ओळख त्यांचे भक्त आणि अखिल मानवजातीला व्हावी; म्हणून संत, महर्षि, सप्तर्षी इत्यादी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपात स्वतःचा वाटा उचलत असतात. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन, प.पू. कर्वेगुरुजी, प.पू. आबा उपाध्ये, यांसारखे महर्षितुल्य संत प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याविषयी साधक अन् समाज यांना ओळख करून देत आहेत. याचसमवेत सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून महर्षि पू. डॉ. ॐ उलगनाथन्, भृगुसंहितेच्या माध्यमातून श्री. सेल्वम्गुरुजी आणि अनेक नाडीसंहितांच्या माध्यमातून अनेक महर्षि वंशज प.पू. डॉक्टरांचे अवतारी कार्य, तसेच हिंदु राष्ट्राविषयी जगाला ओळख करून देत आहेत.
परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हेच श्रीहरि विष्णूचे कलियुगातील समष्टीची बुद्धी शुद्ध करणारा अवतार होत !‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीहरि विष्णूचे कलियुगातील अवतार आहेत. हे अवतार म्हणजे समष्टीची बुद्धी शुद्ध करणारा, अर्थात् गुरुभक्तीद्वारे (गुरुकृपायोगाद्वारे) साधना करून ज्ञानाच्या आधारावर समाजाला धर्म आणि राष्ट्र यांप्रती जागृत अन् क्रियाशील करणारा ज्ञानशक्तीरूपी अवतार !’ – सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. |
संत
१. प.पू. ताई कर्वे यांनी प.पू. डॉ. आठवले यांना त्यांच्या आश्रमातील श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या हातातील बासरी देऊन ‘बासरी वाजवल्यावर लाखो साधक सनातनकडे येतील’, असे सांगणे आणि १० वर्षांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गोपींसारखा भाव असणार्या साधिका येणे
‘कृष्ण लहानपणापासूनच माझ्याशी बोलतो. तो मला सांगतो, त्याप्रमाणे मी कृती करते. कृष्णाने मला सांगितले, ‘बासरी वाजवल्यावर गोप-गोपी जसे एकत्र येतात, तसेच प.पू. डॉ. आठवले यांनी माझ्या हातात असलेली बासरी वाजवल्यावर लाखो साधक सनातनकडे येतील.’ वर्ष २००१ मध्ये प.पू. डॉ. आठवले आमच्या आश्रमात आले होते. त्या वेळी मी आश्रमातील श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या हातात असलेली बासरी, श्रीकृष्णाचे चित्र असलेले पदक, तसेच एक घड्याळ त्यांना दिले. हे घड्याळ देण्यामागील उद्देश म्हणजे, कृष्ण सांगत आहे की, वेळ झाल्यावर मी येईन.’
– प.पू. ताई कर्वे, बदलापूर, ठाणे. (फोंडा, गोवा येथील आश्रमातील सत्संग : २ जानेवारी २००२)
(प्रत्यक्षातही १० वर्षांनी सनातनमध्ये गोपींसारखा भाव असणार्या साधिका आल्या आणि साधकांनी समष्टी त्रासाच्या निवारणार्थ भगवान श्रीकृष्णाचा नामजप करणेही चालू केले. – संकलक)
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या प्रथम भेटीतच ते कृष्णावतार असल्याचे ओळखणे
‘१८.२.२००५ दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आमच्या अकोला येथील रहात्या घरी भेट झाली. मला प्रथम भेटीतच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामधील श्रीकृष्णतत्त्व ओळखता आले. भेटीनंतर मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पत्राद्वारे कळवले की, ‘आपण भेटलात, तेव्हा ‘प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्णाचीच भेट झाली’, असे मला वाटले आणि श्रीमद़्भगवद़्गीतेतील ४ थ्या अध्यायातील श्लोक आठवला. आजच्या अराजकाच्या परिस्थितीत खर्या सनातन धर्माची स्थापना करण्यासाठी योगेश्वर श्रीकृष्णाने आपल्याद्वारे कार्य चालू केले आहे. श्रीकृष्णामध्ये असलेले गुण आपल्यामध्ये दिसून येतात. समाजाला साधनेकडे वळवणे, हे कार्य श्रीकृष्णाचे आहे आणि ते या श्रीकृष्णानेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) करावे.’
– परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.१२.२०१६)
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून भगवान विष्णूचा अवतारच पृथ्वीतलावर प्रतिबिंबित झाला आहे !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य श्रीविष्णूच्या कृपेने विश्वभर होईल आणि ‘सनातन धर्म काय आहे’, हे लोकांना कळेल. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना (२ स्त्रियांना) ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित केले आहे. भगवान शिवानेही गंगेला (म्हणजेच स्त्रीशक्तीला) डोक्यावर धारण केले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून भगवान विष्णूचा अवतारच पृथ्वीतलावर प्रतिबिंबित झाला आहे’, असे प.पू. सदानंद स्वामी यांनी सांगितले.’
– प.पू. आबा उपाध्ये, पुणे (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून प.पू. सदानंद स्वामी करत असलेले मार्गदर्शन) (२१.३.२०१९)
महर्षि आणि सप्तर्षी जीवनाडी
१. महर्षि मयन यांनी उलगडलेले भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर या दोन अवतारांतील साम्य !
‘श्रीकृष्ण द्वारकेला जाऊन शेवटी तिथेच राहिला. श्रीकृष्णाने त्याच्या वयाच्या ८४ व्या वर्षी अवतार संपवला. श्रीकृष्णाने सुदाम्याची भेट झाल्यावर त्याच्याकडील पोहे खाल्ले, त्या दिवशी अक्षय्य तृतीया होती. द्वारकेमध्ये सर्व गोप-गोपी श्रीकृष्णासह राहिले, तसेच आता सनातनचे सर्व साधक परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत रामनाथी आश्रमात रहात आहेत. श्रीकृष्ण अवतार असूनही त्याच्या अवतारकाळात त्याच्यावर अनेक संकटे आली आणि प्रत्येक वेळी श्रीकृष्णच विजयी झाला. आताही तसेच होत आहे. अवतारस्वरूप गुरु असतांना सनातन संस्थेवर अनेक संकटे आली, तरी शेवटी ‘प्रत्येक संकटात गुरूंचा विजय होणार’, हे निश्चित आहे.’ (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १३५, पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचे चेन्नई येथील कार्यालय, चेन्नई, तमिळनाडू. (१६.४.२०१८))
२. भृगु महर्षींनी श्री. सेल्वम्गुरुजी यांच्या माध्यमातून सनातन संस्थेसाठी जीवनाडीपट्टीद्वारे केलेले मार्गदर्शन
२ अ. महर्षि धर्मसंस्थापनेचे कार्य थेट करू शकत नसल्याने त्यांना माध्यम लागत असणे, ‘कलियुगातील या काळात धर्मसंस्थापनेचे कार्य करण्याचे माध्यम हे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, हे महर्षींना ठाऊक असल्यामुळे ते त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना साहाय्य करत असणे आणि हे कार्य करतांना महर्षींना लांछन लागले, तरी ते धर्मासाठी कार्य करतच असणे : ‘महर्षि धर्मसंस्थापनेचे कार्य थेट करू शकत नाहीत. यासाठी त्यांना माध्यम लागते. त्यामुळे ते त्या माध्यमाच्या पाठीशी पूर्णपणे उभे रहातात. या कार्यातील प्रवासाचा शेवट ‘धर्मसंस्थापना होणे’, हा असला, तरी प्रवासातील मधले टप्पे ईश्वर त्याच्या मायेने झाकून ठेवतो. म्हणजेच याला ‘ईश्वरी लीला’ म्हणू शकतो. ‘या मधल्या टप्प्यांत नेमके काय घडणार आहे ?’, या संदर्भात महर्षींनासुद्धा ज्ञात नसते, तर केवळ ‘ईश्वरी आज्ञेने कार्य करणे’ एवढेच त्यांना ज्ञात असते. या मधल्या टप्प्यांत साधकांना त्रास होणार असतील किंवा कार्यात अडथळे येणार असतील, तरी ते सर्व ईश्वर पाहून घेतो. कलियुगातील या काळात धर्मसंस्थापनेचे कार्य करण्याचे माध्यम हे परात्पर गुरु डॉक्टर आहेत.
– सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.
हे महर्षींना ठाऊक असल्यामुळे ते त्यांच्या पाठीशी उभे रहात आहेत आणि त्यांना साहाय्यही करत आहेत. हे कार्य करतांना महर्षींना लांछन लागले, तरी ते धर्मासाठी कार्य करतच असतात. (भृगु महर्षींनी श्रीविष्णूच्या छातीवर लाथ मारली; म्हणून श्रीलक्ष्मीने रागावून भृगु महर्षींना शाप दिला आणि वैकुंठातून निघून पृथ्वीवर आली. श्रीलक्ष्मीच्या शोधार्थ निघालेल्या श्रीविष्णूने पृथ्वीवर तिरुमला येथे श्री बालाजीचा अवतार घेतला. ही भगवंताची लीलाच आहे. या लीलेत भृगु महर्षींना श्रीविष्णूच्या छातीवर लाथ मारल्याचे लांछन लागले, तरीही त्यांनी भगवंताच्या लीलेत आपले कर्तव्य केले.)’
३. परात्पर गुरु डॉक्टरांची अवतारी लीला महर्षींनी सोदाहरण स्पष्ट करणे
३ अ. ‘परम गुरुजींनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) केलेल्या प्रत्येक कृतीचा संबंध राष्ट्रातील घडामोडींशी आहे, हे तुम्हाला हळूहळू लक्षात येऊ लागेल’, असे महर्षींनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारी कार्याविषयी बोलतांना सांगणे : ‘महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांनी १८ मे २०१७ या दिवशी स्वतःच्या अमृत महोत्सवाच्या वेळी श्रीकृष्णालंकार आणि श्रीकृष्णाचा वेश धारण केला. याविषयी बोलतांना महर्षि म्हणाले, ‘याचे कारण आम्ही नंतर आपल्याला सांगू. परम गुरुजींनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) केलेल्या प्रत्येक कृतीचा संबंध राष्ट्रातील घडामोडींशी आहे, हे तुम्हाला हळूहळू लक्षात येऊ लागेल.
३ आ. ‘परम गुरुजींची (परात्पर गुरु डॉक्टरांची) जन्मकुंडली आणि राष्ट्राची कुंडली यांत काहीही भेद नाही’, असे महर्षींनी सांगणे : ‘परम गुरुजींच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) कुंडलीत असणारे ग्रह आणि त्यांचा होणारा परिणाम हा राष्ट्रात घडणार्या महत्त्वाच्या घटनांशी संबंधित आहे, म्हणजेच परम गुरुजींची जन्मकुंडली आणि राष्ट्राची कुंडली यांत काहीही भेद नाही, हेच आम्ही (महर्षि) सर्वांना सिद्ध करून दाखवणार आहोत.’
३ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीकृष्णालंकार धारण केल्याचा परिणाम म्हणून विष्णुधाम असणार्या बद्रिनाथ येथून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक असणारे सुदर्शनचक्र सुटल्याने तेथे हिमस्खलन होणे; परंतु जीवितहानी न होणे आणि ‘ही सर्व परम गुरुजींचीच (परात्पर गुरु डॉक्टरांचीच) लीला आहे’, असे महर्षींनी सांगणे : महर्षींच्या वरील वाक्यांचा प्रत्यय आम्हालाही आला. १८ मे २०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीकृष्णालंकार आणि श्रीकृष्णाचा वेश परिधान केला अन् त्याच्या दुसर्याच दिवशी विष्णुधाम असलेल्या श्री बद्रिनाथ येथे हिमस्खलन होऊन १५ सहस्र भाविक त्यात अडकले; परंतु सुयोगाने जीवितहानी झाली नाही. ‘ही सर्व परम गुरुजींचीच (परात्पर गुरु डॉक्टरांचीच) कृपा आणि लीला’, असे महर्षि म्हणाले. ‘श्रीकृष्ण वेशाचा परिणाम म्हणून विष्णुधामात काय घटना घडली, ते अनुभवले ना ?’, असे महर्षींनी आम्हाला विचारले. याचा अर्थ महर्षींनी सांगितला, तो असा ‘आता परम गुरुजींनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) श्रीकृष्णालंकार धारण केल्याने प्रत्यक्ष बद्रिनाथ या विष्णुस्थानातूनच सुदर्शनचक्र सुटले आहे. त्याला आता कुणी थांबवू शकणार नाही. हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यावरच ते थांबेल. हे विनाशरूपी सुदर्शनचक्र सुटल्याचे प्रतीक म्हणूनच त्या भूमीत हिमस्खलन झाले.’
३ ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीरामाचा वेश धारण केल्यामुळे दुर्जन वृत्तींच्या नाशासाठी श्रीरामाचा बाण सुटल्याने रावणभूमी असणार्या श्रीलंकेत गेल्या ५० वर्षांत पडला नाही इतका मुसळधार पाऊस पडणे आणि ही सर्व घटना परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारी लीलेचाच एक भाग असल्याचे महर्षींनी सांगणे : महर्षींनी सांगितल्याप्रमाणेच एक घटना १९ मे २०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीरामाचा वेश परिधान केल्यानंतर घडली. २८ मे २०१७ पासून काही दिवस श्रीलंकेत इतका पाऊस पडला की, ‘गेल्या ५० वर्षांत असा पाऊस कुणी पाहिला नाही’, असे तेथील लोक म्हणत आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीरामाचा वेश धारण करणे आणि रावणभूमी असलेल्या श्रीलंकेत विनाशकारी प्रलयाला आरंभ होणे, हा दैवी योगायोग नव्हे, तर काय आहे ? या वेळी घडलेल्या घटनेचे वर्णन करतांना महर्षि म्हणाले, ‘आता श्रीरामाचा बाण सुटलाच आहे. त्याचाच हा प्रताप आहे. हा परम गुरुजींच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) अवतारी लीलेचाच एक भाग आहे.’ या वेळी ‘१६४ लोक मृत, १०४ लोक बेपत्ता आणि ५ लाख लोक बेघर झाले आहेत’, असे वृत्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साहाय्यासाठी २ जहाजे तिकडे पाठवल्याचेही वृत्त होते. यावरून महर्षींनी सांगितले, ‘पाहिलेत ना ? परम गुरुजींनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) केलेली प्रत्येक गोष्ट राष्ट्रात घडणार्या महत्त्वाच्या घटनांशी संबंधित असते.’
३ उ. ‘वरील दोन्ही घटना विचारांत घेता, त्यांवरून ‘रेझोनन्स इफेक्ट’च्या उदाहरणाची मला आठवण झाली’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे : वरील दोन्ही घटनांसंदर्भात परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘जसे ‘रेझोनन्स इफेक्ट’मध्ये दोन समान कंपनसंख्येच्या स्वरशूलांपैकी (ट्युनिंग फोर्कपैकी) एकामध्ये कंपने निर्माण केली, तर दुसर्यामध्येही ती निर्माण होतात, तसेच हे आहे.’ परात्पर गुरु डॉक्टरांनी एखादी कृती केली की, त्यांच्याशी संबंधित घटकांवर त्या कृतीचा परिणाम होतो. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे जीवन आता विश्वाशी निगडित झाले असल्याने जसा विश्वातील अनिष्ट गोष्टींचा परिणाम त्यांच्यावर होत आहे, तसेच त्यांनी केलेल्या कृतींचा परिणामही विश्वावर होत आहे,’ हे यातून लक्षात येते. यावरून महर्षींनी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘अवतार’ का म्हटले आहे, तेही लक्षात येते. अवतारी कार्यातच अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वीवर घडणार्या उल्लेखनीय घडामोडींचा परामर्श घेतला जातो.
३ ऊ. ‘परम गुरुजींचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) कार्य हे सामान्य नसून अवतारी स्वरूपाचे असल्याची ओळख पुढे लोकांना पटण्यास प्रारंभ होईल’, असे महर्षींनी सांगणे : महर्षि पुढे म्हणाले, ‘पृथ्वीवर घडणारी प्रत्येक गोष्ट परम गुरुजींनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) तेथे (रामनाथी आश्रमात) बसून केलेल्या कृतीशी कशी संबंधित आहे, हे वेळोवेळी आम्ही सिद्ध करून दाखवणार आहोत. यामुळेच परम गुरुजींचे कार्य हे सामान्य नसून अवतारी स्वरूपाचे आहे, याची ओळख लोकांना पटण्यास प्रारंभ होईल.’
(संदर्भ : पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना आलेल्या महर्षींच्या आदेशातून, २८.५.२०१७)’
४. ‘प.पू. गुरुदेव पृथ्वीवर येतील आणि धर्मप्रसाराचे कार्य करतील’, हे केवळ त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज, प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश आणि श्री अनंतानंद साईश यांचे गुरु चंद्रशेखरानंद यांनाच ठाऊक होते !
‘प.पू. गुरुदेव कोण आहेत ?’, हे कुणीही ओळखू शकत नाही. ते सप्तर्षींना आणि देवतांनाही ठाऊक नाही. ‘प.पू. गुरुदेव पृथ्वीवर येतील आणि धर्मप्रसाराचे कार्य करतील’, हे त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज, प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश आणि श्री अनंतानंद साईश यांचे गुरु चंद्रशेखरानंद यांनाच ठाऊक होते. ‘तीन गुरूंनंतर प.पू. गुरुदेव येणार आहेत आणि पृथ्वीवर अशा प्रकारचे कार्य करणार आहेत’, हे सर्व रहस्यमय ठेवण्याचे नियोजन या तीन गुरूंनीच केले होते. त्यांनी हे पृथ्वीवरील कुणालाच कळू दिले नाही; परंतु शास्त्राच्या माध्यमातून महर्षि प.पू. गुरुदेवांना प्रकट करत आहेत. ही महर्षींची लीला आहे. (गोव्यात ‘रामनाथी आश्रम’ होण्यापूर्वी वर्ष १९९३ मध्ये गोव्यातील श्री रामनाथ देवस्थान येथे प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा साजरी झाली. तेव्हा प.पू. भक्तराज महाराज म्हणाले होते, ‘‘सनातनच्या कार्याचे मुख्य केंद्र गोव्यात करा. त्याला ‘विश्वदीप’ असे नाव द्या. गोव्यातून जगभरच्या प्रसाराला आरंभ होईल.’’ गोव्यातील रामनाथी येथे २००५ या वर्षी सनातनचा आश्रम झाला.)
(वर्ष २००६ पासून जगभरच्या प्रसाराला आरंभ झाला. जानेवारी २०१४ मध्ये गोव्यात ‘अध्यात्म विश्वविद्यालय’ स्थापन करण्याच्या दृष्टीने कृती करण्यास आरंभ झाला.)’
(संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीवाचन क्र. ३०, खोली क्र. ३१६, हॉटेल व्हाईट मेडोज, मनाली, हिमाचल प्रदेश. (२२.७.२०१५))
५. श्रीविष्णु, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याप्रमाणे कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये ज्या ईश्वराविषयी, परमात्म्याविषयी उल्लेख आहे, ते परम गुरु म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले होत. ज्याप्रमाणे श्रीविष्णूने वराह अवतारामध्ये वेदांचे रक्षण केले, श्रीरामावतारामध्ये रामराज्य आणले आणि श्रीकृष्णावतारामध्ये गोप-गोपींसाठी ‘द्वारका’ ही नवीन नगरी स्थापन केली, तसेच कार्य आता परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, तोवरच हिंदु राष्ट्र येणार आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कोणतीच अपेक्षा किंवा इच्छा राहिली नाही. केवळ ‘सर्वत्र नामजप करणारे आणि साधना करणारे साधक असावेत आणि हिंदु राष्ट्र यावे’, असे त्यांना वाटते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना जो भक्तीमार्ग दाखवला आहे, त्या मार्गानेच ते साधकांना पुढे नेणार आहेत.’ – सप्तर्षी (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्रमांक ८१, २१.५.२०१६, स्थळ : सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)
६. प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याची महती समजल्यावर जाणवलेली सूत्रे !
६ अ. महर्षीनी प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याविषयी संकीर्तन करतांना काळही स्तंभित होणे आणि प.पू. डॉक्टरांच्या संकीर्तनामुळे साधकांमध्ये भावभक्ती निर्माण होणे : आम्ही साधक त्यांना जाणण्यात अल्प पडल्याने प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याची महती सांगण्यासाठी ब्रह्मर्षि आणि महर्षि यांना त्यांची ओळख करून देण्यास पुढे यावे लागले. त्यांना प. पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याची थोरवी आम्हाला सांगावी लागते. असे असले, तरी प. पू. डॉक्टरांची आम्हा साधकांवर प्रीती, दया आणि करुणा हीच की, नाडीवाचनाच्या माध्यमातून महर्षि प. पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याविषयी संकीर्तन करतात, तेव्हा केवळ साधकच नव्हे, तर काळसुद्धा स्तंभित होऊन त्यांच्या संकीर्तन भक्तीत देहभान हरपून जातो. ‘आपल्या श्रीगुरूंना आपण ओळखू शकत नाही’, हे अनुभवल्यानंतर त्यांची महिमा संकीर्तन करणारा कुणी वक्ता सतत लाभावा, ही आस साधकांच्या मनी सुप्तपणे असते, तसेच ‘आपल्या श्रीगुरूंचा जो काही महिमा कळला, तो इतरांना सांगत सुटावे’, अशी तळमळ साधकांमध्ये निर्माण होते. ही भावभक्ती प. पू. डॉक्टरांनी आम्हा साधकांमध्ये निर्माण केली. ही त्यांची आम्हा साधकांवरील अपार करुणा अन् कृपा आहे. त्यासाठी आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी शब्दांत कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती बोबडी अन् तोकडी आहे.
६ आ. प.पू. डॉक्टरांचे कार्य अनेक पटींनी वाढल्यानंतर त्यांच्या कार्याची गती पकडू शकत नाही’, याची अनुभूती येणे : कालांतराने प.पू. डॉक्टरांचे कार्य एखादे कमळ उमलावे, तसे अल्प काळात अनेक पैलूंत अत्यंत गतीने पसरायला लागले. त्या वेळी ते मला आणि अनेक साधकांना पेलवेनासे झाले. यातून प. पू. डॉक्टरांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘गुरु की खसखस, चेले कि बस बस’ (अर्थ : गुरु खसखशीएवढे थोडेसे ज्ञान देतात, तरी शिष्याला ‘आता बस, यापेक्षा अधिक नको’, असे होऊन जाते.) या वाक्याची अनुभूती आम्हाला दिली आणि ‘आपले गुरु अवतारी आहेत आणि त्यांच्या अवतारी कार्याचा पुढील टप्पा चालू झाला अन् त्यांच्या कार्याचा वेग आता कुणाला पकडता येणार नाही’, याची मला जाणीव झाली. यातून ‘मी माझ्या गुरूंना अंशतः ही ओळखू शकत नाही’, हे माझ्या लक्षात आले; परंतु हे लक्षात आणून देणे, ही त्यांची आम्हा साधकांवर अत्यंत प्रीती, दया, करुणा आणि कृपा होती. त्यामुळेच ‘मी प. पू. डॉक्टरांना ओळखले आणि मी गुरुकार्य करू शकतो’, हा अहंभावी विचार आणि संस्कार यांना छेद मिळाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने अहंभावावर मात करण्याची अन् शरणागतीची प्रक्रिया चालू झाली.
– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |