‘वांद्रे-वर्सोवा सी लिंक’ला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याला मंत्रीमंडळाची मान्यता !

मुंबई – ‘वांद्रे-वर्साेवा सी लिंक’ या समुद्रीमार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे, तर मुंबई पारबंदर प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या निर्णयाला २८ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ मार्च २०२३ या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या दोन्ही नावांची शिफारस केली होती.

वांद्रे ते वर्साेवा हा १७ किलोमीटरचा रस्ता आहे. सध्या या भूमार्गाने प्रवास करतांना दीड घंटा इतका वेळ लागतो. ‘वांद्रे-वर्सोवा सी लिंक’मुळे हे अंतर वाहनातून २०-२५ मिनिटांत होऊ शकणार आहे. या मार्गासाठी ११ सहस्र ३३२ कोटी रुपये इतका व्यय होणार आहे. मुंबई पारबंदर किंवा शिवडी-न्हावा-शेवा पारबंदर या मार्गाला ‘शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू’ असे नाव देण्यात येणार आहे. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर हा २२ किलोमीटर लांबीचा हा पूल बांधण्यात येत आहे. हा पूल भारतातील सर्वांत मोठा पूल ठरणार आहे. या पुलामुळे मुंबईतील शिवडी भाग नवी मुंबईला जोडला जाईल.