सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपरिषदेत विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार !

सामाजिक कार्यकर्ते वसंत उपाख्य अण्णा केसरकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप

सावंतवाडी नगरपरिषद

सावंतवाडी – येथील नगरपरिषदेने विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या माध्यमातून ठेकेदारांना पोसण्याचे काम करून नगरपरिषद जनतेच्या पैशाची लूट करत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत उपाख्य अण्णा केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री. वसंत उपाख्य अण्णा केसरकर

या वेळी केसरकर म्हणाले,

१. ‘‘शहरातील बंद प्रकल्पांवरही खर्च करण्यात आला आहे. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. यापुढे नगरपरिषदेतील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. येथील जिमखाना मैदान आणि डॉ. स्वार यांच्या रुग्णालयाच्या समोरील मैदान यांचे परीक्षण करण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. कोणते परीक्षण आणि कसला विकास केला जात आहे, हे अनाकलनीय आहे. या मैदानात कुठलेही काम केले जात नसतांना पैसा कसा खर्च केला जातो ? याचे आश्‍चर्य वाटते.

२. जिमखाना मैदानासाठीचा खर्च, बंद असलेले ‘हेल्थ पार्क’, शहरातील बंद असलेले वाचन कट्टे, तसेच शिवउद्यान यांवरही  लाखो रुपये अनावश्यक खर्च केले जात आहेत. पालिकेचे कर्मचारी असतांना विविध प्रकल्पांच्या रक्षणासाठी सेवा पुरवण्यासाठी कर्मचारी नेमून लाखो रुपये खर्च केले जात आहेत.

३. पाणीटंचाई भासत आहे. पाणीपट्टी भरावी लागते म्हणून नगरपरिषद सुधारित योजना नाकारात आली आहे; परंतु दुसर्‍या बाजूला विनाकारण पैशाची उधळपट्टी केली जात आहे.

४. भविष्यात जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जनतेने आता सावध राहिले पाहिजे. मिळालेल्या माहितीनुसार, १ कोटी ४० लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.’’

संपादकीय भूमिका

या आरोपांच्या प्रकरणी तातडीने अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक !