हिंदूंच्‍या श्रद्धा हा ‘फॅशन’चा विषय ?

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

सध्‍या बाजारात देवतांची चित्रे असलेल्‍या डिझायनर साड्या विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत. दुर्दैवाने ‘फॅशन’ म्‍हणून कित्‍येक हिंदू स्‍त्रिया या साड्या अंगावर घेऊन मिरवत आहेत. ‘कोणत्‍याही देवतेचे नाव घेतले, तर त्‍या देवतेशी संबंधित शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि शक्‍ती एकत्र असतात’, असा अध्‍यात्‍माचा सिद्धांत आहे. यानुसार त्‍या त्‍या संबंधित चित्रांच्‍या माध्‍यमातून त्‍या देवतेचे तत्त्व तेथे आकर्षित झालेले असते. देवतांच्‍या चित्रांची जागा साडीवर नसून त्‍यांचे स्‍थान देवघरातच हवे. आपल्‍या घरातही प्रत्‍येक वस्‍तूची जागा ठरलेली असते. स्‍वयंपाकघरातील भांडी आपण स्‍वच्‍छतागृहात ठेवत नाही. त्‍याचप्रमाणे देवतांचे स्‍थान हे देवघरातच हवे. कलियुगात हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नसल्‍याचा हा परिणाम आहे.

खरेतर हिंदूंच्‍या श्रद्धा हा ‘फॅशन’चा विषय कधीच होऊ शकत नाही. अशा डिझायनर साड्यांवर धर्मप्रेमी हिंदूंनी बहिष्‍कार टाकायला हवा; पण दुर्दैवाने असे होतांना दिसत नाही. या साड्या धुतांना त्‍या देवतांची विटंबना होते, हेही हिंदु स्‍त्रियांच्‍या लक्षात येत नाही. याचे कारण म्‍हणजेच स्‍वधर्माविषयी असलेले अज्ञान ! हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. आजकाल पायपुसणी, चप्‍पल इतकेच नव्‍हे, तर शौचालयाच्‍या भांड्यावरही देवतांची चित्रे असल्‍याचे लक्षात येते. चित्रपट, नाटके, विज्ञापन आदी माध्‍यमांतूनही हिंदूंच्‍या देवीदेवतांचे विडंबन चालू आहे, तरीही हिंदू निद्रिस्‍त आहेत. ताजे उदाहरण द्यायचे झाल्‍यास ‘आदिपुरुष’ चित्रपटात युद्धाच्‍या एका प्रसंगात ‘रावण भगवान श्रीरामाला एका हाताने अगदी सहज उचलून फेकून देतो’, असे दाखवले गेले आहे. हिंदू इतके आंधळे आणि बहिरे झाले आहेत का ? याउलट इतर धर्मियांच्‍या श्रद्धास्‍थानांचे विडंबन झाल्‍याचे कळताच ते करणार्‍यांसह संपूर्ण समाजालाच सळो कि पळो करून सोडतात. अन्‍य धर्मीय कधीच आपल्‍या प्रेषितांचा वा धर्माचा अवमान करत नाहीत आणि इतरांनाही करू देत नाहीत.

हिंदु सहिष्‍णू असल्‍यामुळेच आजकाल कुणीही हिंदु धर्म, देवीदेवता आणि श्रद्धास्‍थाने यांचे विडंबन करण्‍याचे धाडस करत आहे. त्‍यामुळे अशांचा हिंदु धर्माचा अवमान करण्‍याचे धाडस पुन्‍हा होणार नाही, असा वचक हिंदूंनी देशभरात निर्माण करायला हवा. त्‍यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन व्‍हायला हवे. हिंदूंनी निद्रिस्‍तपणा त्‍यागून ते धर्मरक्षणासाठी सिद्ध झाल्‍यास देवही त्‍यांचे रक्षण करील !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे