हिंदु राष्ट्राच्या या धर्मयुद्धात कितीही अडचणी आल्या, तरी आम्ही सतत पुढे जात रहाणार ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव – सप्तम दिवस : संतांचे विचार

रामनाथी (फोंडा), २२ जून (वार्ता.) – सर्व धर्माभिमानी हिंदु राष्ट्र स्थापनेचे  धर्मयुद्ध लढत आहेत. त्यामुळे या कार्यामध्ये स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर विविध अडचणी येत असतात. तरीही भगवंताच्या कृपेने या अडचणींवर मात करून आम्ही सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करतच रहाणार आहोत, असे मत सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या शेवटच्या दिवशी व्यक्त केले.

पू. रमानंद गौडा

ते पुढे म्हणाले,

१. हे धर्मयुद्ध लढत असतांना विविध अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी साधना केली पाहिजे. त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक बळ मिळते, तसेच आपल्या कार्यामागे भगवंताचे अधिष्ठान प्राप्त होते. त्यामुळे आपण आपले कार्य अधिक चांगले करू शकतो आणि नेहमी पुढे जात रहातो.

२. साधनेने आपल्या भोवती सूक्ष्म संरक्षण कवच निर्माण होते. त्यामुळे अनिष्ट शक्तींपासून आपले रक्षण होते.

३. प्रारब्धानुसार प्रत्येकाला सुख-दु:ख भोगावे लागते. धर्मकार्य करत असतांना कधी कधी पोलिसांचा दबाव असतो. काही वेळा समाजाचाही विरोध होतो. आपली साधना असल्यास अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर रहाता येते. तसेच आपले कार्य अखंड चालू ठेवता येते.

४. सनातनच्या साधकांची भगवंतावर श्रद्धा असल्याने त्यांच्या मुखावर तेज असते. त्यामुळे त्यांचे अनिष्ट शक्तींपासूनही रक्षण होते.