रामनाथी, २१ जून (वार्ता.) – आज सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला आहे. याविषयी सर्वजण नाराज आहेत; पण त्याविषयी काय करता येईल, हे ठाऊक नसल्यामुळे ते अडकतात आणि भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग बनतात. अशा सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी वर्ष २०१७ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू केले. शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील अपप्रकारांविरुद्ध घटनात्मक पद्धतीने लढा देणे आणि जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
‘सुराज्य अभियान’ हे आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येकच गोष्टीमध्ये लागू होणार्या समस्यांसाठी आहे. त्यामुळे आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करतो की, आपल्या परिसरात होत असलेल्या अपप्रकारांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा द्यायला आरंभ करा. हाही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.