नवी मुंबई, २० जून (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेच्या सी.बी.एस्.ई. मंडळाच्या शाळेची शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आंदोलन करण्याची चेतावणी आयुक्त राजेश नार्वेकर यांना दिली आहे. जून अखेरपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. मनविसेने यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे.
गेली दोन वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे येथे सी.बी.एस्.ई. बोर्डाची शाळा चालू केली आहे; पण तिला अद्याप मान्यता मिळालेली नाही. शाळेत शिक्षकही नाहीत. त्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या १ सहस्र ३६५ इतकी आहे; पण त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक अल्प आहेत. त्यामुळे आता एकदिवसाआड शाळा भरवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यावर पालक संतप्त झाले आहेत.