रामनाथ देवस्थान (गोवा) – आता श्रीराम मंदिर बनत आहे; पण धर्मांध आक्रमकांनी अतिक्रमण केलेली सर्व मंदिरे परत मिळवणे हा आमचा प्रण आहे. त्यांच्या कह्यातून मथुरा, काशी, धार (मध्यप्रदेश) आणि ताजमहल येथील हिंदूंची धार्मिक स्थळे मुक्त करण्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे, असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता तथा ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे संरक्षक अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन यांनी केले. येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या तृतीय दिनी (१८.६.२०२३ या दिवशी) ते बोलत होते.
अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन पुढे म्हणाले, ‘‘कोणे एके काळी ‘सोने की चिडिया’ असणारा हिंदूंचा भारत आता इतिहास बनला आहे आणि हिंदूंना त्यांच्या अस्तित्वासाठी न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेर लढाई लढावी लागत आहे. हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष करत असतांना आपण इतिहासामध्ये धर्मासाठी बलीदान देणार्या धर्मयोद्ध्यांना विसरत चाललो आहोत. अशा सहस्रो धर्मयोद्ध्यांची नावे घेतल्याविना आपण पुढे जाऊ शकत नाही. महाराणा प्रताप, शिख धर्मगुरु यांनी हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलीदान केले; पण पराभव स्वीकारला नाही. आपल्याला त्यांच्याहून अधिक संघर्ष करून हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. तरच त्या धर्मयोद्ध्यांना शांती मिळेल. भारताच्या राज्यघटनेने निर्माण केलेल्या वर्तमान व्यवस्थेमध्ये कोणतेही सरकार आले, तरी ते या देशाला हिंदु राष्ट्र बनवू शकत नाहीत. तसे झाले, तर त्याला आव्हान देण्यात येईल. त्यामुळे हिंदूंनाच संघटित होऊन हिंदु राष्ट्र मिळवणे आवश्यक आहे.’’