संत एकनाथ महाराजांची पालखी दादेगाव येथील गावकर्‍यांनी अडवली !

पारंपरिक मार्गावरून जाण्‍याची मागणी !

पैठणच्‍या दादेगाव येथील गावकर्‍यांनी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखी अडवली

छत्रपती संभाजीनगर – शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीने १० जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्‍थान केले; मात्र ११ जूनच्‍या सकाळीही पैठणच्‍या दादेगाव येथील गावकर्‍यांनी अडवली आहे. संत एकनाथ महाराज पालखी मार्गातील रस्‍त्‍याची दुरवस्‍था पहाता यंदा मार्गात काही प्रमाणात पालट करण्‍यात आले आहेत; मात्र प्रतिवर्षी ज्‍या गावातून ही पालखी जाते, त्‍या गावातील नागरिकांना हा निर्णय मान्‍य नाही. त्‍यामुळेच पालखी अडवण्‍यात आल्‍याची माहिती मिळत आहे, तसेच गावकर्‍यांनी रस्‍ता बंद आंदोलन केले. त्‍यामुळे यावर तोडगा काढण्‍यासाठी प्रयत्न चालू असून लवकरच यावर मार्ग काढून पालखी मार्गक्रमण करणार आहे, अशी माहिती पालखीमधील वारकर्‍यांनी दिली आहे, तर घटनास्‍थळी पोलीस आले असून त्‍यांच्‍याकडून गावकर्‍यांची समजूत काढण्‍याचा प्रयत्न चालू आहे.

संत एकनाथ महाराज पालखी

वारकर्‍यांना प्रत्‍येक वर्षी मूलभूत सोयीसुविधांसाठी लढावे लागते !

संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्‍या पालखीस ‘प्रस्‍थानत्रयी’ म्‍हणून ओळखले जाते. आळंदी, देहू आणि पैठण येथून या पालख्‍या निघतात. आळंदी आणि देहू येथून निघणार्‍या पालखीस  शासन सुविधा उपलब्‍ध करून देते. याउलट संत एकनाथ महाराज यांच्‍या पालखीस मूलभूत सोयीसुविधांसाठी प्रशासनाकडे झगडावे लागत आहे. आरोग्‍य, पोलीस बंदोबस्‍त, मुक्‍कामासाठी जागा, पाण्‍याच्‍या टँकरपासून ते पालखीसमवेतच्‍या दिंड्यांना पंढरपूर येथील प्रवेशास लागणार्‍या पाससाठी संघर्ष करावा लागतो. ग्रामीण भागातून जाणारी संत एकनाथ महाराज यांची एकमेव पालखी असून त्‍यास सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याविषयी राज्‍यशासन उदासीन आहे, असे गावकर्‍यांचे म्‍हणणे आहे.