सांगली – मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीतील रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवर टाकलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी १४ कोटी रुपयांचे सोने, हिरे आणि रोकड चोरली होती. दरोडेखोरांनी शोरूममध्ये घुसून पोलीस असल्याचे कर्मचार्यांना सांगितले. त्यानंतर त्यांच्यावर बंदूक रोखून हात-तोंड बांधले. दरोडेखोरांना शोरूममधील कर्मचार्यांनी बघितले होते.
तसेच ‘सीसीटीव्ही फुटेज’मध्येही काहीजण दिसले आहेत.
या आधारे पोलिसांनी चौघांची रेखाचित्रे बनवली आहेत. ही रेखाचित्रे सामाजिक माध्यमांवरून सर्वत्र फिरत आहेत. पोलीस ठाण्यांना, तसेच राज्याबाहेरही रेखाचित्रे पाठवून त्यांचा शोध घेतला जात आहे. रेखाचित्रातील संशयितांना कुणी पाहिले असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या दरोड्यात वापरलेली एक टाटा सफारी मोटार मिरज-पंढरपूर रस्त्यावरील भोसे येथील यल्लमादेवी मंदिराच्या मागील बाजूस शेतात सापडली, तर दुचाकी मिरज म्हैसाळ बायपासवर सापडली आहे. दरोडेखोरांच्या शोधात विविध राज्यांत पोलीस पथके रवाना झाली असून दरोडेखोरांचा कसून शोध चालू आहे.