चोडण येथे पूर्वी श्री देवकीकृष्ण मंदिर होते आणि समितीला या मंदिराचे अवशेष सापडले आहेत.
पणजी, ७ जून (वार्ता.) – पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी सरकारच्या पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याने तज्ञांचा समावेश असलेल्या ५ सदस्यीय समितीची जानेवारी २०२३ मध्ये स्थापना केली आहे. प्राप्त माहितीनुसार समितीने यासंबंधी त्यांचा अहवाल सरकारला सुपुर्द करण्यास ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतची मुदत मागितली आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
पोर्तुगीज कालावधीत उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गतवर्षीच्या अर्थसंकल्पात केली होती आणि यासाठी चालू वर्षी तज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती. या समितीला पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची सूची सिद्ध करण्यास सांगितले होते, तसेच लोकांनाही अशा मंदिरांची माहिती समितीकडे देण्यास सांगण्यात आले होते. पुरातत्व विभागाने समितीने आतापर्यंत केलेल्या कार्याच्या अहवालाविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार दर्शवला आहे. सूत्रानुसार लोकांनी एकूण १९ प्रकरणे समितीच्या निर्शनास आणली आहेत आणि यामधील काही प्रकरणे संवेदनशील आहेत. समितीने यातील सुमारे ७ – ८ प्रकरणांना अनुसरून संबंधित ठिकाणी जाऊन पहाणी केली आहे. चोडण येथे पूर्वी श्री देवकीकृष्ण मंदिर होते आणि चोडण येथे समितीला या मंदिराचे अवशेष सापडले आहेत. गोव्याच्या संग्रहालय खात्याकडे देवतांच्या अनेक पाषाणाच्या मूर्ती आहेत. जुने गोवे येथे असलेल्या केंद्रीय संग्रहालयामध्येही देवतांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती कोणत्या मंदिरांच्या आहेत, त्याचा इतिहास शोधून काढायला पाहिजे. पुरातत्व विभागाच्या कागदपत्रांमध्ये ८०० ते १ सहस्र मंदिरे उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे. पोर्तुगिजांनी मंदिरे उद्ध्वस्त केल्यानंतर त्यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये तोडण्यात आलेल्या सर्व मंदिरांची माहिती आहे. या सर्व कागदपत्रांचा अभ्यास करून त्याची अहवालात नोंद करावी लागणार आहे. यासाठी समितीने सरकारकडे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत मागून घेतली आहे.