युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज !

नुकताच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार ३५० वा राज्याभिषेक सोहळा पार पडला. या वेळी लाखो शिवभक्त रायगडावर जमले होते. ‘या विराट शक्तीचा वापर राजकीय हेतूने न करता राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी जर झाला, तर खर्‍या अर्थाने महाराजांप्रती कृतज्ञता ठरेल’, असे वाटते. सध्या बलात्कार, हत्या, दंगल, लव्ह जिहाद, भूमी जिहाद, हलाल अशा अनेक माध्यमांतून धर्मांध हिंदूंना वेठीस धरत आहेत आणि येनकेनप्रकारेण ‘इस्लामी राष्ट्रा’साठी प्रयत्नरत आहेत. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘न्यायव्यवस्थे’मधून आपण प्रेरणा घेणे आवश्यक आहे.

बलात्काराच्या शिक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराज ‘चौरंगा’ (दोन्ही हाय आणि पाय कापण्याची शिक्षा) करायचे. ‘आतंकवाद कसा संपवावा लागतो ?’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘अफझलखानाचा वध’ हे आहे. भूमी (लँड) जिहाद म्हणजे ‘आपल्या हक्काच्या भूमीवरून शत्रूचा ताबा कसा उठवावा ?’, याचे उदाहरण म्हणजे शाहिस्तेखानाला  छत्रपती शिवरायांनी पुण्यातून पिटाळून लावल्याचे आहे ! छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यासाठी अनेक मावळ्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यामागे अनेक मावळ्यांचा निरपेक्ष त्याग होता.

स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी एक शिस्त घालून दिली आणि जो या शिस्तीचे पालन जो करणार नाही, मग तो स्वकीय असो किंवा परकीय त्याला तात्काळ शिक्षा व्हायची. त्यामुळे कायद्याचा धाक असायचा. आता बलात्कार्‍याला तात्काळ तर नाहीच; पण अनेक वर्षांनीही शिक्षा होईल, याची निश्चिती नसते. तो अल्पवयीन असेल, तर त्याला सोडून देण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात ‘आत्मनिर्भरते’च्या  दृष्टीने स्वतःची अशी व्यवस्था चालू केली. त्यामध्ये स्वतःचे चलन, भाषा, पंचांग, सैन्य, न्यायव्यवस्था, आरमार आदी निर्माण केले. तसेच परकियांना आपल्यासमवेत व्यवहार करावा लागला, तर त्यांना आपल्या पद्धतीनुसार सर्व करावे लागेल, अशी व्यवस्था निर्माण केली. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले ‘स्वराज्य’, म्हणजे एखादा राजकीय पक्ष काढण्यासारखे नव्हते, तर त्यामध्ये ‘सर्वसामान्यांपासून प्रत्येक स्तरावरच्या व्यक्तीला आपले वाटेल’, असे प्रजेचे ते राज्य होते आणि ते ज्या परिस्थितीमधून उभे राहिले, त्याला ‘एका नव्या युगाचा आरंभ’ असे म्हटले गेले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘युगप्रवर्तक’ म्हटले जाते.

– श्री. जयेश बोरसे, पुणे