सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील २३ देवस्थानांचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित होणार

कुडाळ – कुडाळ शहरातील श्री देव कुडाळेश्‍वर मंदिरासह तालुक्यातील प्रमुख २३ देवस्थानांच्या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

श्री. नीलेश राणे

याविषयी भाजप नेते तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा करून देवस्थानांच्या परिसराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार विकास आराखडा बनवून अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना प्रादेशिक पर्यटन संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत. २३ देवस्थानांपैकी पहिल्या टप्प्यात ११ आणि दुसर्‍या टप्प्यात १२ देवस्थानांचा परिसर विकसित केला जाणार आहे. यामध्ये श्री देव रवळनाथ मंदिर, ओरोस बुद्रुक; श्री सिद्ध महादेव मंदिर, केरवडे कर्याद नारूर; श्री लिंग रवळनाथ मंदिर, पोखरण; श्री देवी भगवती मंदिर, आंब्रड; श्री देव गिरोबा मंदिर, भडगाव; श्री देवी भराडी मंदिर, वाडीवरवडे; श्री देवी भावई मंदिर, गोठोस; श्री देव जटाशंकर मंदिर, नेरूर कर्याद नारूर; श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर, वालावल; श्री देव स्वयंभू महादेव मंदिर, पांग्रड; श्री देव कलेश्‍वर मंदिर, नेरूर आदी देवस्थानांचा समावेश आहे.