गोव्यात आजपासून स्मार्ट सिग्नल कार्यान्वित होणार

स्पीड रडार गन पोलीस विभागाला सुपुर्द

(स्पीड रडार गन म्हणजे वाहनांची अचूक माहिती नोंद करणारा उच्च तंत्रज्ञान असलेला कॅमेरा)

पोर्टेबल स्पीड रडार गन

पणजी, ३१ मे (वार्ता.) – पर्वरी येथील सचिवालयात ३१ मे या दिवशी वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी १० पोर्टेबल स्पीड रडार गन पोलीस विभागाला सुपुर्द केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने बसवलेले कृत्रिम बुद्धीमत्ता असलेले कॅमेरे १ जूनपासून कार्यान्वित होतील.

स्पीड रडारच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती देतांना गुदिन्हो म्हणाले, हा उच्च तंत्रज्ञान असलेला कॅमेरा आहे. तो इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करून दिवसा २०० मीटर अंतरावरून आणि रात्री १०० मीटर अंतरावरूनही अचूकपणे वाहनाचा क्रमांक, तसेच वाहनधारकांनी हेल्मेट परिधान केले आहे कि नाही किंवा चारचाकी वाहनचालकाने सीटबेल्ट लावला आहे कि नाही ते ओळखतो आणि व्हिडिओ अन् छायाचित्र या माध्यमातून नोंद ठेवतो. त्यानुसार ज्या वाहनाने नियमांचे उल्लंघन केले असेल, त्या वाहनाच्या मालकाला त्यांच्या पत्त्यावर दंड भरण्यासाठी नोटीस पाठवली जाणार आहे. वाहतूक विभाग रस्त्यावर शिस्त लावण्यासाठी विविध गोष्टींवर काम करत आहे. या पोर्टेबल स्पीड रडार गनमुळे वेगवान वाहने ओळखण्यास साहाय्य होईल. पोलिसांना उपकरणांच्या वापराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि जून मासात आगाऊ वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी उपकरणे वापरल्यानंतर काही दिवसांत प्रशिक्षणाची दुसरी फेरी घेतली जाईल.

(सौजन्य : Goa 365 TV) 

रस्त्यावरील वाढत्या अपघातांमुळे होणार्‍या मृत्यूंविषयी चिंता व्यक्त करून गुदिन्हो म्हणाले, वर्ष २०२२ मध्ये ३ सहस्र ७ रस्ते अपघात झाले आणि २५१ लोकांचा मृत्यू झाला. बेशिस्तपणे आणि अतीवेगाने वाहन चालवणे, हे या अपघातांचे प्रमुख कारण आहे. नवीन मोटार वाहन कायद्यात दंडात वाढ झाली असली, तरी लोक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याने अधिकचा दंड हा प्रतिबंधक नाही.