ईश्‍वराची कृपा संपादन करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राच्‍या कार्यात सहभागी होऊया ! – सद़्‍गुरु नंदकुमार जाधव

नगर येथील हिंदु एकता दिंडी !

नगर – सध्‍या आपल्‍यावर वेगवेगळ्‍या माध्‍यमातून संकटे येत आहेत, यामधून भगवंतच आपल्‍याला वाचवू शकतो. वर्ष २०२५ मध्‍ये हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणारच आहे, यासाठी आपण सर्वांनी मिळून आपली साधना होण्‍यासाठी हे कार्य करूया, असे मार्गदर्शन सनातन संस्‍थेचे सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने नगर येथे हिंदु एकता दिंडी काढण्‍यात आली होती. दिंडीच्‍या समारोपीय सत्रात ते बोलत होते. त्‍याच समवेत येणार्‍या आपत्‍काळाची भीषणता आणि आपत्‍काळात टिकून रहाण्‍यासाठी साधनेचे महत्त्व, तसेच उपाययोजना सांगितल्‍या. या दिंडीतील हिंदु राष्‍ट्राच्‍या जयघोषामुळे वातावरण हिंदुमय वाटत होते.

पालखीपूजन

आकर्षक फुलांनी सजवलेल्‍या पालखीत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपति यांच्‍या प्रतिमांचे पूजन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर, सद़्‍गुरु नंदकुमार जाधव, इस्‍कॉन संप्रदायाचे रोमपाददासजी महाराज यांच्‍या हस्‍ते पूजन करून दिंडीला प्रारंभ झाला. दिंडीमध्‍ये विविध संघटना, संप्रदाय पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. दिंडीत ठिकठिकाणी स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके दाखवून समाजातील लोकांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडी मार्गातील व्‍यावसायिक धर्मप्रेमी दिंडीवर फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्‍वागत करत होते. व्‍यापार्‍यांनी दिंडीतील सर्वांना पाणीवाटप केले. दिंडीला सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार मानून दिंडीची सांगता करण्‍यात आली. या दिंडीमध्‍ये विविध संघटना, संप्रदाय मिळून अनेक धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

क्षणचित्रे

१. दिंडीतील भजनांचा आवाज ऐकून घरातील महिला-पुरुष बाहेर येऊन पालखीला भावपूर्ण नमस्‍कार करत होते.

२. दिंडीत सहभागी झालेले इस्‍कॉन आणि वारकरी संप्रदाय, तसेच इतर जिज्ञासू दिंडीमध्‍ये तल्लीन होऊन नृत्‍य करत होते.

विशेष

१. ‘हिंदु एकता दिंडी’ या फ्‍लेक्‍समधील ‘जयंत’ (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यातील ‘जयंत’ हे नाव) या शब्‍दावर एक फुलपाखरू बराच वेळ बसून होते.

२. सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांचे समारोपीय मार्गदर्शन सर्व संप्रदायातील जिज्ञासू, हिंदुत्‍वनिष्‍ठ धर्मप्रेमी अत्‍यंत एकाग्रतेने ऐकत होते, तेव्‍हा वातावरणामध्‍ये शांतता जाणवून भगवान श्रीकृष्‍णाचे अस्‍तित्‍व जाणवले.

३. निमगाव वाघ येथील ह.भ.प. फलके महाराज त्‍यांच्‍या शिक्षणसंस्‍थेतील लहान मुलांचे पथक टोपी, धोतर आणि सदरा घालून टाळ मृदुंगाच्‍या गजरात सहभागी झाले होते.

४. इस्‍कॉन संप्रदायकडून दिंडीच्‍या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्‍यात आले होते.