(म्हणे) ‘पोलीस खात्याचे भगवेकरण होऊ देणार नाही !’ – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

बेंगळुरू (कर्नाटक) – तुम्ही पोलीस खात्याचे भगवेकरण करणार आहात का ? आमच्या सरकारमध्ये असे होऊ देणार नाही, अशी चेतावणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बैठकीत बोलतांना त्यांना दिली. या वेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही उपस्थित होते.

१. उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले की, कर्नाटक पोलीस विभागाची देशभरात चांगला ओळख होती. तो सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्ही नष्ट केली आहे. जिकडे पहाल तिकडे तुम्हाला केवळ पैसे दिसत होते. आमच्या सरकारमध्ये सर्व काही स्वच्छ असले पाहिजे. लोकांना या सरकारकडून मोठा पालट अपेक्षित आहे. याचा प्रारंभ पोलीस खात्यापासूनच करावी, अशी सूचना त्यांनी पोलिसांना दिली.

२. शिवकुमार पुढे म्हणाले की, आम्हाला तुमच्याकडून पैशांची आवश्यकता नाही. लोकांना त्रास होऊ नये, असे काम करणे पुरेसे आहे. तुमचे पूर्वीचे वर्तन आमच्या सरकारला मान्य नाही. तुम्ही माझ्यासमवेत आणि सिद्धरामय्या यांच्या समवेत कसे वागलात ?, हे मला ठाऊक आहे. हे सर्व आमच्या सरकारमध्ये चालणार नाही. तुम्हाला तुमचे वर्तन पालटावे लागेल, नाहीतर आम्ही तुम्हालाच पालटू. आम्ही द्वेष करत नाही. त्यावर आमचा विश्‍वास नाही. प्रामाणिकपणे काम केल्यास आम्ही तुमच्या पाठीशी राहू. जनतेने या सरकारवर विश्‍वास ठेवला आहे. या सरकारमधून परिवर्तन घडत आहे, असा संदेश तुमच्या कामातून जनतेला द्या.

संपादकीय भूमिका

  • कर्नाटकमधील पोलीसदलाचे भगवेकरण झाले असते, तर एव्हाना तेथील हिंदुत्वनिष्ठांची हत्या करणार्‍या धर्मांधांना शिक्षा झाली असती, हे शिवकुमार यांनी लक्षात घ्यावे !
  • कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार असतांना पोलीसदलाचे भगवेकरण होणार नाहीच; मात्र त्याचे हिरवेकरण होईल, हे मात्र निश्‍चित !